‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सध्या देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच दहशतवादावर आधारित आणखी एक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात ‘७२ हूरें’ ( 72 Hoorain) चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला असून, हा चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा : हॉलीवूड अभिनेत्याने दीपिका पदुकोणसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले “रणवीर भाई जरा जपून…”
‘७२ हूरें’चा टीझर रिलीज झाल्यावर अनेकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली असून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. पण, दुसरीकडे वाढत्या विरोधादरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित एक नवीन घोषणा केली आहे. आतापर्यंत ‘७२ हूरें’चा फक्त हिंदी टीझर रिलीज झाला होता. मात्र, चित्रपटाचा टीझर आणखी १० भाषांमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘७२ हूरें’चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. चित्रपटाचा टीझर १० भाषांमध्ये रिलीज करण्याबाबत दिग्दर्शक म्हणाले, “भारताच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या विषयाची गांभीर्यता लक्षात यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे चित्रपटाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही.”
हेही वाचा : दीपिका पदुकोणने पतीला केले ट्रोल; इन्स्टाग्रामवर रणवीर सिंहसाठी शेअर केला भन्नाट मीम
चित्रपटाचे निर्माते गुलाबसिंग तन्वर म्हणाले, “एवढ्या गंभीर विषयावर चित्रपट बनवणे सोपे काम नाही. हा चित्रपट बनवण्यामागचा आमचा हेतू, प्रत्येकापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही १० भाषांमध्ये टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.” ‘७२ हुरें’च्या आमिषाने तरुणांची कशी दिशाभूल होते हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल, असेही निर्मात्यांनी सांगितले.
चित्रपटाची निर्मिती अशोक पंडित यांनी केली असून, याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंह चौहान यांनी केले आहे. चित्रपट ७ जुलै २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.