‘दंगल’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री झायरा वसीमच्या वडिलांचं निधन झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने याबाबत माहिती दिली आहे. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘दंगल’ चित्रपटात झायराने आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती.

झायराने दिवगंत वडिलांबरोबर बालपणीचा फोटो शेअर करत त्यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्री लिहिते, “या क्षणाला माझे डोळे पाणावलेले आहेत अन् माझं मन अतिशय दु:खी आहे. जाहिद वसीम, या माझ्या वडिलांचं निधन झालं आहे. मी सर्वांना विनंती करते की, तुमच्या प्रार्थनेत त्यांची आठवण ठेवा. माझ्या वडिलांना मी सदैव स्मरणात ठेवेन. अल्लाह त्यांचं नेहमीच रक्षण करेल.”

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलीवूड कलाकार दिसणार ‘या’ ड्रेसकोडमध्ये; पाहुण्यांसाठी जेवणाचा मेन्यू आहे खूपच खास

वडील होते सर्वात मोठा आधार

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यावर झायराने ‘पिंकव्हिला’ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, तिच्या वडिलांना राष्ट्रीय पुरस्काराबाबत फारशी माहिती नव्हती. हा किती मोठा पुरस्कार आहे हे त्यांना माहीत नव्हतं. आपल्या वडिलांना दोन तास बसवून तिने या पुरस्काराबाबत समजावून सांगितलं होतं. झायराला जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा तिचे आई – वडील तिथे उपस्थित होते आणि तिला तिच्या पालकांसमोर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा अभिमान वाटतो.

हेही वाचा : “मला हा निर्णय…”, २६ दिवस बेपत्ता होण्याबद्दल गुरुचरण सिंगने सोडलं मौन; कायदेशीर बाबींचा उल्लेख करत म्हणाला…

झायरा वसीम अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या चित्रपटात तिने छोट्या गीता फोगटची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं. याशिवाय झायरा आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटात झळकली होती. तसेच प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात देखील तिने काम केलं होतं. वयाच्या १६ व्या वर्षी झायरा वसीमला ‘दंगल’ साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा : फक्त तीन कलाकार, १५ दिवसांत शूटिंग अन्…, ‘या’ भयपटाने केलेली बक्कळ कमाई, कुठे पाहता येणार सिनेमा? जाणून घ्या

दरम्यान, सध्या झायरा वसीम फिल्मी जगापासून दूर आहे. आता ती फक्त सोशल मीडियावरच सक्रिय असते. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी झायराने तिच्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.