बॉलिवूडमधील अभिनेते अभिनेत्री यांच्या जोड्या जशा प्रसिद्ध आहेत तशा अभिनेत्यांच्यादेखील जोड्या प्रसिद्ध आहेत. नव्व्दच्या दशकात गोविंदा- चंकी पांडे, जॅकी श्रॉफ अनिल कपूर तशी आणखीन एक जोडी प्रसिद्ध झाली ती म्हणजे संजय दत्त- अर्शद वारसी, अर्थात सगळ्यांचे लाडके मुन्ना भाई आणि सर्किट. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटात ही जोडी पहिल्यांदा झळकली होती. हीच जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.
मुन्नाभाई चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ही जोडी शेवटची दिसली होती. प्रेक्षकांना आता तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. अशातच अर्शद वारसीने आपल्या ट्वीटवर आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर केलं आहे. त्याने लिहले आहे, “माझा भाऊ संजय दत्तसोबत आणखी एका सुपर एंटरटेनिंग चित्रपटासाठी काम करत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, आमची प्रतीक्षा तुमच्यापेक्षा जास्त आहे.” अशा शब्दात त्याने कॅप्शन लिहला आहे. पोस्टरमध्ये दोघे कैद्यांच्या वेशात दिसत असून दोघे कारागृहात दिसत आहेत.
अर्शदने हे ट्वीट शेअर करताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे मुन्नाभाई आणि सर्किट परत का? तर दुसऱ्याने लिहले आहे, सरजी मुन्नाभाई मालिकेची पुढची आहे का? तर आणखीन एकाने लिहले आहे, अभिनंदन मुन्ना भाई, सर्किट… पुन्हा चांगली केमिस्ट्री पाहण्याची आम्हाला आशा आहे. अशा कमेंट्स येत आहेत.
या चित्रपटाची निर्मिती संजय दत्त याने केली आहे. याआधी त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. सिद्धांत सचदेव हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नाही.