गायक-रॅपर बादशाहने देहराडूनमधील एका कॉन्सर्टदरम्यान यो यो हनी सिंगबरोबर त्याचं १५ वर्षांपासून सुरू असलेले भांडण जाहीरपणे सोडवलं. बादशाहने ग्राफेस्ट २०२४ च्या दरम्यान त्याचा परफॉर्मन्स मध्येच थांबवून यो यो बरोबर असलेलं भांडण सोडण्याची इच्छा व्यक्त केली. बादशाहने नमूद केलं की, त्यांच्यामध्ये एका गैरसमजामुळेच फूट पडली होती. त्याने आता यो यो हनी सिंगला शुभेच्छा दिल्या आणि भूतकाळ मागे सोडण्याची इच्छा व्यक्त केली.

बादशाहचा कॉन्सर्टदरम्यानचा हा व्ह़िडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत बादशाह म्हणतो, “माझ्या आयुष्यात असा एक टप्पा होता, जिथे मी एका व्यक्तीच्या विरुद्ध राग बाळगला होता. पण, आता मला तो राग पाठीमागे सोडून द्यायचा आहे आणि ती व्यक्ती म्हणजे हनी सिंग. काही गैरसमजामुळे मी नाखूश होतो, पण मला याची जाणीव झाली की जेव्हा आम्ही दोघं एकत्र होतो तेव्हा आम्हाला जोडणारे खूप कमी होते, पण तोडणारे खूप जास्त होते. त्यामुळे आज मी सर्वांना सांगू इच्छितो की, मी तो राग मागे सोडला आहे आणि मी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो.”

हेही वाचा… “प्रत्येक सेलिब्रिटीचं एक रेशन कार्ड…”, जान्हवी कपूरने पापाराझींबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

बादशाह आणि हनी सिंग हे भारतातील आघाडीचे रॅपर म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. दोघांनी पहिल्यांदा त्यांच्या करिअरची सुरुवात माफिया मुंडेर या रॅप ग्रुपचे सदस्य म्हणून केली, ज्यात इक्का, लिल गोलू आणि रफ्तार हे रॅपरदेखील होते.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

या बँडने “खोल बोटल”, “बेगानी नार बुरी” आणि “दिल्ली के दिवाने” यांसह अनेक लोकप्रिय गाण्यांसाठी एकत्र काम केलं. भांडणानंतर दोघं वेगळे झाले आणि सोशल मीडियावर नियमितपणे एकमेकांबद्दल टीका केली.

हेही वाचा… “माझी जीभ काळी आहे”; फराह खान तिच्याशी वाईट वागणाऱ्यांना देते शाप; म्हणाली, “त्यांचे २-३ चित्रपट फ्लॉप…”

बादशाहच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर बादशाह आणि हनी सिंगच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओनंतर बादशाहने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. ज्याला कॅप्शन देत त्याने लिहिलं, “शांतता आणि प्रगती”