आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री म्हणजेच जान्हवी कपूर. जान्हवीनं तिच्या करिअरची सुरुवात ‘धडक’ या चित्रपटापासून केली. मग ‘गुंजन सक्सेना – द कारगिल वॉर’, ‘गुड लक जेरी’, ‘मिली’ असे हिट चित्रपट देत तिनं प्रेक्षकांची वाहवा मिळवली. जान्हवी सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’च्या प्रमोशन्समध्ये व्यग्र आहे. त्यादरम्यान जान्हवीनं दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे.

बॉलीवूड कलाकारांचे अनेक क्षण पापाराझी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असतात. अभिनय क्षेत्राबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते कॅप्चर करण्याच्या प्रयत्नात असतात. सेलिब्रिटींनुसार पापाराझी त्यांचे फोटो काढतात, असं जान्हवी म्हणालीय. जान्हवीनं असंदेखील उघड केलं की, सेलिब्रिटीच्या लोकप्रियतेनुसार, पापाराझींना त्या कलाकाराच्या प्रत्येक फोटोसाठी पैसे दिले जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीनं या सगळ्याबद्दल भाष्य केलं आहे.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, “आता ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’ प्रमोशन सुरू आहे म्हणून मी आता विमानतळावर असेन, तर त्यांना माझे फोटो काढण्यासाठी बोलावलं जातं. पण, जेव्हा चित्रपटाचं प्रमोशन नसतं आणि जेव्हा माझं कोणतंही शूट सुरू नसतं आणि मला जेव्हा माझा असा स्वत:चा वेळ हवा असतो तेव्हा ते अधिक मेहनत घेतात आणि असं बहुतेक वेळा झालंय. ते माझ्या कारचा पाठलाग करतात. कारण- त्यांना प्रत्येक फोटोसाठी पैसे मिळतात.”

जान्हवी पुढे म्हणाली, “प्रत्येक सेलिब्रिटीचं एक रेशन कार्ड आहे. त्यांचे फोटो या या किमतीला विकले जातात. जर तुमची किंमत जास्त असेल, तर ते कसंही करून तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्यासाठी तुमच्या कारचाही पाठलाग करतात.आणि जर किंमत जास्त नसेल, तर तुम्हाला पापाराझींना कॉल करून बोलवावं लागतं.”

हेही वाचा… “माझी जीभ काळी आहे”; फराह खान तिच्याशी वाईट वागणाऱ्यांना देते शाप; म्हणाली, “त्यांचे २-३ चित्रपट फ्लॉप…”

दरम्यान, जान्हवीचा ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’ हा चित्रपट ३१ मे २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवीबरोबर राजकुमार राव प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तसेच जरीना वहाब, कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी या कलाकारांच्याही निर्णायक भूमिका यात आहेत.

जान्हवीच्या कामाबाद्दल सांगायचं झालं, तर ‘उलझ’, ‘देवरा’ तसंच ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या आगामी चित्रपटांमध्ये ती झळकणार आहे.