बॉलीवूड चित्रपटसृष्टीतली दिग्दर्शिका फराह खान आणि सुपरस्टार अनिल कपूर यांनी कपिलच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला नुकतीच हजेरी लावली होती. या दोघांच्या डबल धमाक्यामुळे या मुलाखतीला चार चांद लागले.

फराह खानचा विनोदी स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा, तसेच अनिल कपूरच्या डॅशिंग अंदाजाने या शोमध्ये मजा आणली. या शोदरम्यान अनेक किस्से घडले. अनिल कपूर आणि फराह यांनी मुलाखतीदरम्यान जर त्यांना कोणाचा बदला घ्यायचा असेल, तर तो ते कसा घेतात याबद्दलही आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं.

हेही वाचा… “होगा तुमसे प्यारा कौन?” ‘पारू’ मालिकेतील शरयू आणि पूर्वाचा हटके डान्स व्हायरल; पाहा VIDEO

जेव्हा कपिलनं त्यांना विचारलं, “जे लोक तुमच्याशी वाईट वागतात, त्यांचा जर तुम्हाला बदला घायचा असेल, तर तो तुम्ही कसा घेता?” तेव्हा अनिल कपूर म्हणाले, “मी आणखी जास्त चांगलं काम करून, ज्या व्यक्तीचा बदला घ्यायचाय त्याचा बदला घेतो.”

फराह खानलाही तोच प्रश्न विचारला असता, ती म्हणाली, “मी बदला घेत नाही; पण माझ्याजवळ नकारात्मक भावना ठेवते. मी मनात बोलते की, तुझी वाट लागायला हवी. माझी जीभ काळी आहे.”

फराह पुढे म्हणाली की, जर कोणी तिला खरोखर दुखावले असेल किंवा तिच्याशी वाईट वागले असेल, तर ती त्यांना शाप देते. “बेट्या तुझे पुढचे दोन-तीन चित्रपट तर गेलेच म्हणून समज. त्यामुळे अलीकडच्या काळात ज्यांचे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यांनी समजून घ्या की, मी त्यांना शाप दिला आहे.”

हेही वाचा… “पुस्तकांची दुकाने बंद…”, नीना गुप्ता यांनी ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘लापता लेडीज’ या चित्रपटांवर व्यक्त केलं मत, म्हणाल्या…

तेवढ्यात अनिल कपूर म्हणाले, “माझे तर सगळे चित्रपट हिट आहेत.” यावर फराह अनिल कपूर यांना म्हणाली, “पापाजी, मी तुझ्यासाठी असा विचार कधीच करणार नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे.”

दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नवव्या एपिसोडमध्ये फराह खान आणि अनिल कपूर यांनी उपस्थिती दर्शविली होती. हा एपिसोड शनिवारी २५ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. फराह खान दिग्दर्शनाबरोबर अभिनेत्री, नृत्यदिग्दर्शक, लेखिकादेखील आहे. फराह खानने ८० हून अधिक चित्रपटांमध्ये १०० हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी सात फिल्मफेअर पुरस्कारदेखील फराहने जिंकले आहेत.