चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी हिंदी चित्रपटसृष्टी ‘पठाण’नंतर पुन्हा आयसीयु मध्ये गेल्याचं नुकतंच एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. ‘पठाण’ नंतर आलेले एक दोन चित्रपट सोडले तर बाकी सगळ्या बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचं आपल्याला दिसत आहे. या चित्रपटांमुळे आणि त्यांच्या फ्लॉप होण्यामुळे बरेच निर्मातेही संभ्रमात पडले आहेत.
प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनीदेखील नुकतंच या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. सध्याचे फिल्ममेकर्स हे स्वतःमध्ये बदल करत नसल्याने बॉलिवूडची ही अवस्था आहे असं त्यांनी नुकतंच भाष्य केलं आहे. प्रसिद्ध युट्यूबर राज शमामीच्या पॉडकास्टमध्ये नुकतंच रॉनी यांनी हजेरी लावली अन् चित्रपट व्यवसाय आणि एकूणच बॉलिवूडला लागलेली उतरती कळा यावर त्यांनी भाष्य केलं.
आणखी वाचा : हॉलिवूड अभिनेते अल पचीनो यांनी ‘या’ भूमिकेसाठी नसीरुद्दीन शाह यांच्याकडून गिरवले होते अभिनयाचे धडे
रॉनी म्हणाले, “मी खरं यावर अधिक भाष्य करू शकणार नाही, पण फिल्ममेकर म्हणून आपण प्रेक्षकांना प्रचंड गृहीत धरलं आहे. आपण स्वतःमध्ये काहीच बदल केलेला नाही. मी स्वतः या इंडस्ट्रीचा भाग आहे आणि मला त्याचा गर्व आहे, पण आजही बरेच फिल्ममेकर्स हे त्यांच्या विश्वात असतात, त्यांना त्यांच्या विश्वाबाहेर पडायची इच्छाच नाहीये.”
एकूणच ही परिस्थिती फार बिकट आहे असं रॉनी यांच्या एकंदर मुलाखतीमधून स्पष्ट झालं आहे. रॉनी स्क्रूवाला हे चित्रपट क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहेत. वेगवेगळ्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहेच शिवाय ‘अपग्रॅड’ या कंपनीचे ते चेअरमनही आहेत. रॉनी यांच्या ‘RSVP’ या प्रोडक्शन कंपनीने वेगवेगळे सुपरहीट चित्रपट दिले आहेत.