Animal Hindi Movie Review: “ही लोक कबीर सिंहला हिंसक म्हणाले आहेत, मी यांना दाखवेन की हिंसक चित्रपट काय असतो ते!” चार वर्षांपूर्वी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी एका मुलाखतीमध्ये या शब्दांत समीक्षकांचा समाचार घेतला होता, अन् आता २०२३ मध्ये ‘अ‍ॅनिमल’सारखा चित्रपट देऊ संदीप हे त्यांच्या शब्दाला जागले आहेत असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही. रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटगृहात अखेर प्रदर्शित झाला आहे. परंतु खरंच हा चित्रपट म्हणजे संदीप यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ हिंसक चित्रपट काय आहे हे दाखवायचा अट्टहास आहे की खरंच त्या चित्रपटाला काही अर्थ आहे, याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

खरंतर ‘अ‍ॅनिमल’मधून संदीप यांनी भारतीय चित्रपटांना एक वेगळं वळण दिलंय असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण ज्या गोष्टी दाक्षिणात्य चित्रपटांत आणि खासकरून तेलुगू चित्रपट बेधडकपणे दाखवल्या जातात त्याच गोष्टी कोणताही आडपडदा न ठेवता संदीप यांनी हिंदीत दाखवायचा प्रयत्न केला आहे. निश्चितच हा चित्रपट खूप लोकांना खटकू शकतो, यातील पात्र, घटना, नातेसंबंध, स्त्री-पुरुष समानता यावर आक्षेप घेतला जाणार आहे. इतकंच नव्हे तर तरुण पिढीला यातून एक वेगळाच संदेश जाणार आहे अशी नेहमीची छापील वाक्यंदेखील आपल्याला ऐकायला मिळणार आहेत, समाज बिघडू शकतो अशीही गाऱ्हाणी बरेच लोक गाताना दिसतील. पण या सगळ्यावर मला एकच गोष्ट सांगावी वाटते की, कीर्तनाने समाज जसा सुधारत नाही तसाच तो तमाशामुळे बिघडतही नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवून याकडे केवळ एक चित्रपट म्हणून पाहिलं तर ‘अ‍ॅनिमल’ तुमचं पैसा वसूल मनोरंजन करतो. फक्त गरज आहे ती कोणताही पूर्वग्रह न बाळगता अन् मन थोडं कठोर करून चित्रपट पाहायची. कारण हा चित्रपट सगळ्यांसाठी नाही. ते इंग्रजीत म्हणतात ना “Its not everyones cup of tea.” त्या पठडीतला हा चित्रपट आहे.

Ishita Raj Confesses Love For Hardik Pandya in Interview After His Divorce with Wife
Hardik Pandya: ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री हार्दिक पंड्याच्या प्रेमात, कबुली देत म्हणाली, “माझं त्याच्यावर प्रेम आहे…”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
marathi actress suhasini Deshpande
व्यक्तिवेध: सुहासिनी देशपांडे
shraddha kapoor new house set become akshay kumar neighbour in juhu on rent
कोट्यवधींची मालकीण असून श्रद्धा कपूर राहणार भाड्याने; जुहूमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या शेजारी घेणार फ्लॅट
Remembering iconic talk show host Phil Donahue
व्यक्तिवेध : फिल डॉनाह्यू
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद
entertainment news Review of director Amar Kaushik film Stree 2 hindi movie
मनोरंजनाची गोधडी
ti phulrani dramatization by P L deshpande
‘ती’च्या भोवती : आत्मसन्मानाचं स्फुल्लिंग!

आणखी वाचा : Sam Bahadur Review: बॉलिवूड सेलिब्रिटीजना कसा वाटला ‘सॅम बहादुर’? अभिषेक बच्चन, आशुतोष गोवारीकर ट्वीट करत म्हणाले…

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर ही एका वडील-मुलाच्या नाजुक अन् तितक्याच विचित्र नात्याची गोष्ट आहे जी रोमान्स, कॉमेडी अशी वेगवेगळी वळणं घेत रीव्हेंज ड्रामापर्यंत पोहोचते. भारतातील एका प्रतिष्ठित व सर्वात श्रीमंत अशा उद्योगपती बलबीर सिंहवर जीवघेणा हल्ला होतो अन् या हल्ल्याच्या मागे नेमका कुणाचा हात आहे हे हुडकून काढायचा अन् त्याला यमसदनी पाठवायचा विडा उचलतो तो बलबीर सिंहचा मुलगा रणविजय सिंह. वरवर पाहायला गेलं तर ही एक साधी सरळ कथा वाटते, पण ती तेवढी साधी नाही हे आपल्याला हळूहळू ध्यानात येतं. ३ तास २१ मिनिटांच्या या चित्रपटासाठी संदीप यांनी लिहिलेली कथा, पटकथा ही सर्वोत्तम आहे असं म्हणता येणार नाही, काही ठिकाणी चित्रपट थोडा रटाळ झाला आहे पण तरीही नेमका सस्पेन्स अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत कायम ठेवण्यात संदीप यशस्वी झाले आहेत असं मला वाटतं.

कथा, पटकथेबरोबरच या चित्रपटातील संवाद आणि कॅरेक्टर डेवलपमेंटवर अतिशय बारकाईने काम केलं आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल. रणबीर जरी चित्रपटाचा केंद्रबिंदू असला तरी त्याच्या आसपास रचलेली पात्रंदेखील तितकीच तगडी आहेत. वडील-मुलाच्या या विचित्र नात्याला तर या चित्रपटाने न्याय दिलाच आहे याबरोबरच रणबीर व रश्मिका यांचेही नाते या चित्रपटात ज्या पद्धतीने उलगडण्यात आले आहे ते पाहून बरेच विचार आपल्या मनात येऊ शकतात. तुम्ही जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करता तेव्हा त्या नात्यात कोणताही आडपडदा नसतो, मर्यादा नसतात हे संदीप यांनी पुन्हा एकदा या लव्हस्टोरीच्या माध्यमातून अधोरेखित केलं आहे, अर्थात ही गोष्ट प्रत्येकाच्या पचनी पडेलच असं नाही.

वडील-मुलाच्या नात्यात मात्र काही मर्यादा असतात अन् त्या असायलाच हव्यात हेदेखील संदीप यांनी अत्यंत हुषारीने क्लायमॅक्सच्या अनिल कपूर रणबीर कपूर यांच्या सीनमधून मांडलं आहे. मुळात या चित्रपटातील पात्र आणि त्यांची मानसिकता अशी एकाच फटक्यात पाहून पटणारी किंवा पचनी पडणारी नाही, ती पात्रं त्यांची कृती, त्या कृतीमागचं कारण अन् स्पष्टीकरण या सगळ्यावर संदीप यांनी बारकाईने काम केलं आहे. अगदी अल्फा मेल संकल्पनेपासून विवाहबाह्य संबंध, गुन्हेगारी वृत्ती, स्त्री-पुरुष समानता, मुलांचं पालकांशी असलेलं नातं, कौटुंबिक मूल्यं अशा वेगवेगळ्या विषयांवर संदीप यांनी फार विचारपूर्वक पद्धतीने जे भाष्य केलंय ते फारच अस्वस्थ करणारं आहे आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा एखाद्या कलाकृतीचा लेखक, दिग्दर्शक आणि संकलक ही एकच व्यक्ती असते. या तीनही गोष्टींमध्ये संदीप रेड्डी वांगा यांना पैकीच्या पैकी गुण द्यायलाच हवेत.

बाकी चित्रपटाचं संगीत हे फार वेगळं आहे. मुळात ते कथेशी सुसंगत आहे, जिथे गरज आहे तिथेच तुम्हाला गाणी ऐकायला मिळतात आणि तो सीन अधिक रंगतदार करतात. हर्षवर्धन रामेश्वरचं बॅकग्राऊंड स्कोअरही उत्कृष्ट आहे. खासकरून त्या बॅकग्राऊंड स्कोअरची खरी मजा रणबीर आणि बॉबी देओलमधल्या फाईट सीनच्यावेळी पाहायला मिळते. अमित रॉयची सिनेमॅटोग्राफी लाजवाब आहे. याबरोबरच चित्रपटातील अॅक्शन ही अत्यंत हिंसक आणि अंगावर येणारी आहे. खासकरून मध्यांतराच्या आधी येणारा १८ मिनिटांचा अॅक्शन सिक्वेन्स अन् चित्रपट संपल्यावर पोस्ट क्रेडिटदरम्यानचा सीन पाहताना अस्वस्थ व्हायलाच होतं, त्यामुळे ज्यांना रक्ताचा थेंब पाहूनही फेफरं भरतं त्यांनी तर चुकूनही या चित्रपटाच्या वाट्याला जाऊ नये. चित्रपटात बरेच बोल्ड सीन्स, कीसिंग सीन्स, नग्नदृश्य, शिवीगाळ, रक्तपात असल्याने लहान मुलांसाठी हा चित्रपट नाही.

अभिनयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर संपूर्ण चित्रपटात एकही डायलॉग नसलेल्या अन् अत्यंत कमी स्क्रीन टाइम मिळालेला बॉबी देओल भाव खाऊन जातो. बॉबीचं पात्र नेमकं कोण? त्याची पार्श्वभूमी काय? हे सगळंच तुम्हाला चित्रपटाच्या मध्यांतरानंतर समोर येतं अन् बॉबीने चोख काम केलं आहे. रश्मिका मंदानाला ज्या डायलॉगवरून ट्रोल केलं जातंय तो संपूर्ण सीनच इतका इमोशनल आहे की तो पाहताना चित्रपटगृहात स्मशान शांतता अनुभवायला, रश्मिकाची भूमिका फार गुंतागुंतीची असली तरी तिने उत्तम काम केलं आहे. प्रेम चोप्रा, सुरेश ओबेरॉय अन् शक्ति कपूर यांचीही कामं चांगली झाली आहेत. तृप्ती डीमरीचं पात्र आणि रणबीरबरोबरची तिची केमिस्ट्री हे एक वेगळंच सरप्राइज आहे जे चित्रपट पाहतानाच अनुभवणं अधिक योग्य आहे. अनिल कपूर यांच्या पात्राला मात्र म्हणावा तसा न्याय संदीप यांनी दिलेला नाही, संपूर्ण लक्ष रणबीरच्या पात्रावर असल्याने अनिल कपूर यांचे पात्र लिखाणाच्या बाबतीत थोडे कमकुवत भासते पण त्यांनी नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट काम केलं आहे. इतर सहकलाकारांची कामंही उत्तम झाली आहे.

आणखी वाचा : ‘A’ सर्टिफिकेट देऊनसुद्धा रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’वर चालली सेन्सॉरची कात्री; सुचवले ‘हे’ पाच बदल

रणबीर कपूर तर हा ‘अ‍ॅनिमल’ जगला आहे अन् ते त्याच्या छोट्या छोट्या सीन्समधून, त्याच्या डोळ्यातून स्पष्ट होतं. वडिलांच्या प्रेमात आकंठ बुडालेला, त्यांच्यासाठी कोणत्याही थराला जाणारा रणविजय ते आपल्या वडिलांचा सहवास न मिळाल्याने आतून पार पोखरून गेलेला, मायेसाठी आसुसलेल्या ‘अ‍ॅनिमल’पर्यंतचा हा प्रवास रणबीरने उत्तमरीत्या पडद्यावर साकारला आहे. वडील-मुलाच्या नात्यावर बेतलेले असे डझनभर चित्रपट आले आहेत, परंतु ते सगळे चित्रपट एकीकडे आणि हा ‘अ‍ॅनिमल’ एकीकडे असंच विभाजन करणं योग्य ठरेल. या विचित्र नात्याची अन् त्या नात्यामागील हिंसक बदल्याची गोष्ट तुम्हाला पाहायची असेल अन् तुम्ही या सगळ्या गोष्टी एक प्रेक्षक म्हणून स्वीकारण्यास तयार असाल तर निश्चितच हा ‘अ‍ॅनिमल’ तुम्ही चित्रपटगृहातच जाऊन पाहायला हवा.