The vaccine War Trailer : काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ची घोषणा केली, तेव्हापासून देशभरात हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता आहे. या महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार करण्यामागची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलघडली जाणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं होतं. तेव्हापासूनच याच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.
आणखी वाचा : विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’चा फर्स्ट लूक प्रदर्शित; पोस्टर शेअर करत पल्लवी जोशीने लिहिलं…
तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये आपल्याला भारतीय वैज्ञानिकांनी पहिली कोविड लस कशी तयार केली यामागील संघर्ष, त्या वैज्ञानिकांचं खासगी आयुष्य, त्यांच्या प्रवासात आलेले अडथळे, त्यांचे पाय खेचणारे पत्रकारx अन् या सगळ्यावर मात करत देशाला या महामारीतून बाहेर काढण्यासाठी लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांची जिद्द हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा एक प्रकारचा थ्रिलर चित्रपटच आहे जो एका सत्यघटनेवर बेतलेला आहे.
या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, सप्तमी गौडा, रायमा सेन व अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मध्यंतरी अभिनेता आर माधवन यानेदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं. एकूणच भारताची पहिली स्वतःची लस बनवणाऱ्या असामान्य वैज्ञानिकांची ही असामान्य कथा २८ सप्टेंबर रोजी पडद्यावर उलगडणार आहे.