Article 370 Box Office Collection Day 1: अभिनेत्री यामी गौतम धरचा ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत होता अन् प्रेक्षकांची याला पसंतीही मिळाली. प्रेक्षक हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची आतुरतेने वाट बघत होते. पंतप्रधान मोदींनीही या चित्रपटाचं कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. इतर चित्रपटांच्या मानाने याला पहिल्याच दिवशी मिळालेलं बुकिंग हे फारच उत्तम आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाला ४२.८% बुकिंग मिळालं असून जयपुर, पुणे, दिल्ली, चेन्नई या शहरांमध्ये प्रेक्षकांनी तिकीटबारीवर चांगलीच गर्दी केल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. द कश्मीर फाइल्स या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली होती.

आणखी वाचा : अमेरिकेत अभिनयाचं प्रशिक्षण घेतल्याचा जान्हवी कपूरला होतोय पश्चात्ताप; म्हणाली, “हा वेळ…”

या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल हे प्रमुख भूमिकेत असून यात यामी एका NIA अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे, जीला काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्याची तसेच दहशतवाद्यांची मोहीम हाणून पडायची जबाबदारी देण्यात आलेली आहे. चित्रपटात ‘३७० कलम’ हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सगळ्यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे.

चित्रपटात यामी गौतमसह प्रियामणी, राज जुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, किरण करमरकर, अश्वनी कुमार आणि इरावती हर्षेसारखे मुरलेले कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. यामीचा पती व ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’सारख्या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर यानेच लोकेश धरसह या चित्रपटाची निर्मिती केली आहे.