आमच्या घरात एक प्रथा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला एक कला आणि एक खेळ अवगत असायलाच हवा..! खरंतर आमच्या घरात ते संस्कार माझ्या आजोळातून आले. माझं आजोळ म्हैसूरचं आहे. आईकडे सगळेच मामा आणि मावश्या एका कलेत आणि खेळात निपुण आहेत. गोंदकरांनाही कलेचं आणि खेळाचं तितकंच वेड आहे. कदाचित म्हणूनच माझ्या आई-वडिलांचे सूर जुळले. माझे वडील हे गिर्यारोहक आणि उत्तम स्वीमर होते, तर आई ही कर्नाटकी गायिका आणि नॅशनल स्वीमर आहे. शब्दश: माझी आई दोन्ही सुरांत पक्की आहे. म्हणजे सूर लावण्यात आणि सूर मारण्यात..!! माझ्या सगळय़ाच मावश्या उत्तम गायिका आणि स्वीमर आहेत, तर सगळे मामा उत्तम डायव्हर्स (Divers) आहेत. आता अशी फॅमिली बॅकग्राऊंड असल्यावर हा वारसा पुढे घेऊन जावा, असं माझ्या आईला वाटणं स्वाभाविक आहे म्हणून तिने माझ्याकडे मोर्चा वळवला.
मी चार वर्षांची असतानाच माझ्या आईने मला शास्त्रीय गायनाच्या क्लासेसमध्ये घातलं. एवढय़ा लहान वयात डायरेक्ट शास्त्रीय गायन म्हणजे माझ्यासाठी कठीणच होतं. मला तर या क्लासेसला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण आईने मला सक्तीनं घातलं होतं. आमचे मास्टर ज्या वेळी आम्हाला शिकवायचे तेव्हा एखादी तान किंवा आलाप घेताना मलाच झोप यायची. संगीतातले राग, त्यांचे प्रकार हे सगळं चार वर्षांच्या माझ्या डोक्यावरून जायचं. कदाचित लहान वयात समज नसल्यानं कंटाळा यायचा. नेहमी वाटायचं, की हा क्लास बंद झाला तर किती बरं होईल आणि नेमके काही महिन्यांतच आमच्या क्लासचे सर वारले. क्लास आपोआप बंद झाला. सर वारले याचं वाईट वाटलं. पण क्लास बंद झाल्याचा आनंद होता. मी मनात म्हणाले, चला, आता फायनली आपला क्लास बंद झाला. क्लास सुटला, पण माझी सुटका झाली नाही. इतक्या सहजासहजी माझा संगीतप्रवास तुटणार नव्हता. माझ्या आईने मला एका दुसऱ्या ठिकाणी गायनाच्या क्लासला घातलं. मी क्लास सोडण्यासाठी नवनवीन कारणं शोधत असताना मला एक मस्त कारण मिळालं. मी आईला सांगितलं, की आई, मी दुसऱ्यांच्या घरी जाऊन गाणं शिकणार नाही. मला ते बरोबर नाही वाटत. आई ठीक आहे म्हणाली. मला वाटलं, माझा क्लास सुटला. पण दुसऱ्या दिवशी टिचर आमच्या घरी शिकवायला यायला लागल्या. आता घरी मी आणि टिचर दोघेच असल्याने मला खूपच कंटाळा यायला लागला. मग पाच वर्षांच्या माझ्या डोक्यात अजून एक आयडिया आली. मी आईला सांगितलं, की मला एकटीला गाणं शिकताना कंटाळा येतो. आई म्हणाली, ठीक आहे. मी म्हटलं, चला आता तर माझा शंभर टक्के क्लास बंद होणार. पण दुसऱ्या दिवशी माझ्या आईने आमच्या कॉलनीतल्या मुलींना गाणं शिकण्यासाठी गोळा करून आणलं. माझा हा प्लॅनही फिस्कटला. कॉलनीतल्या मुलींचा गाणं शिकण्याचा उत्साह संपला, पण माझ्या आईचा नाही. तिनं शास्त्रीय गायन मला आवडत नाही की काय म्हणून मला नाटय़संगीताचे क्लास लावले. नंतर ते आवडत नाही की काय म्हणून मला सुगम गायनासाठी अनुराधा मराठेंकडे क्लासमध्ये घातलं. मराठेंकडे गेल्यावर मला काही कारणंच देता येईनात. मग एक दिवस अचानक मला शोध लागला. गाणी मराठीत लिहून घ्यायला लागायची. तेव्हा मी कारण पुढे केलं की मला मराठी लिहिता येत नाही. तेव्हा त्यांच्या मुलीनं मला लिखाणात मदत केली. काही केल्या माझं गाणं काही सुटेना. माझ्या या एवढय़ा क्लासेसमध्ये आई नाटय़संगीत, तबला आणि बरीच वाद्यं मला शिकवायला येणाऱ्या सरांकडून शिकली. पण मी काही शिकले नाही.
smita-gondkar
अखेर माझ्या गाणं शिकण्याच्या प्रवासाला पूर्णविराम मिळण्याचं एक सॉलिड कारण मिळालंच..! माझं सातवीत टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालं आणि मग मी आईला सांगून टाकलं की मला गाताना त्रास होतो. मला गाता येणार नाही. आईनंही त्यावर विश्वास ठेवला आणि मग तिने माझा गाण्याचा क्लास बंद केला. मी जिंकले. तशी मी जिद्दी होते. मला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर ती मी आवडीनं करते. पण जर एखादी गोष्ट फोर्सफुली करायला लावली तर मात्र मला अजिबात आवडत नाही. गाण्याच्या बाबतीत माझं असंच होतं. म्हणजे मला गायला खूप आवडायचं.. पण आईनं फोर्स केला म्हणून मला ते करायचं नव्हतं. पण मी जिद्दी असले तरी माझी आई महाजिद्दी..! तिनं मला ऑपरेशन झाल्यावर शांतपणे विचारलं की तुला नेमका कोणता आर्ट फॉर्म शिकण्याची इच्छा आहे. मी पिआनो शिकायचाय असं सांगितलं. तेव्हा पुण्यात पिआनो शिकवणारं कोणी नव्हतं, तेव्हा आईने पिआनोची बेसिक सुरुवात आपण हार्मोनियमपासून करू, असं म्हणत मला हार्मोनियमचा क्लास लावला. या सगळय़ात अभ्यास, शाळा आणि क्लासेसमध्ये माझी दमछाक व्हायची. शेवटी दहावीचं वर्ष आलं आणि माझा संगीताशी संबंध तुटला.
दहावीनंतर आईने पुन्हा विचारलं, की तुला काय करायचंय..?? मग मी सांगितलं, की मला लॅटीन डान्स शिकावासा वाटतोय. मग मी स्वत:हून लॅटीन डान्स क्लास लावले. साल्सा, जाईव्ह, वॉल्ट्ज, फॉक्सस्ट्रॉट, चाचाचा असे वेगवेगळे डान्स फॉर्म शिकले. गाणं शिकण्याच्या या प्रवासात कळत नकळत माझी क्रिएटिव्ह साइड डेव्हलप होत गेली. आज मी गाणं उत्तम गाऊ शकते. कराओकेवर गाताना मी नेहमीच जिंकते. पण मागे वळून पाहताना असं वाटतं, की आई गाणं शिकण्यासाठी जी खटाटोप करायची ती खरंतर माझ्या फायद्याचीच होती. आज मनापासून वाटतं, की खरंच आपण गाणं शिकायला हवं होतं. आईनं जे काही शिकवलं त्याचा मला आज फायदाच झाला. माझ्यानंतर आईने माझ्या भावाची जुळी मुले ट्रेंड केली. कलेत आणि खेळात ते दोघेही निपुण आहेत. एक सुंदर तबला वाजवतो, तर दुसरा उत्तम पेटी वाजवतो. याचसोबत दोघेही अप्रतिम स्वीमिंग करतात आणि तायक्वांदो खेळतात. आईची शिकवण मला योग्यच वाटते. माणसाला एकतरी कला अवगत असायला हवी. कारण कला तुमच्या जगण्यात तुम्हाला भरभरून आनंद देत असते. तेव्हा तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना फोर्स न करता एखादी कला शिकवा किंवा स्वत:ही एखादी कला शिकून घ्या.. अजूनही वेळ गेलेली नाही…! संधी मिळाली तर मलाही माझ्या पुढील चित्रपटात गाणं गायला नक्की आवडेल…!
– स्मिता गोंदकर