आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांपैकी महत्त्वाच्या व प्रतिष्ठित असलेल्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ‘चैतन्य’दायी ठरला आहे. आशय आणि विषय या दोन्हीबाबती सरस असलेल्या मराठी चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास भाग पाडलं आहे. तब्बल २० वर्षांनंतर भारतीय चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात पोहोचला असून, महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा चित्रपट मराठी आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वात जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव म्हणजे ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’. १९३२ पासून सुरु असलेल्या या महोत्सवात तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रवी जाधव यांनी दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.

“तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट ही आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टीम”, असं ट्विट रवी जाधवने केलं.

दरम्यान, व्हेनिस शहरात भरणाऱ्या या महोत्सवात इ.स. १९३७ साली या चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ हा भारतीय चित्रपट जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानित झाला होता.