‘इंग्लिश विंग्लिश’ची दिग्दर्शिका गौरी शिंदेचा चार वर्षांनी आलेल्या डिएर जिंदगी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला धमाका कायम ठेवला आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर दुसऱ्या चित्रपटालाही प्रेक्षक अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देताना दिसत आहेत. फिल्ममेकिंगच्या रूढ पद्धतींना फाटा देत गौरीने प्रेक्षकांसमोर आणलेल्या एका वेगळ्या प्रयोगाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. चित्रपट समीक्षकांकडून ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद आला असला तरी प्रेक्षकांच्या मनावर मात्र या चित्रपटाने चांगलीच छाप पाडली आहे.

नोटाबंदींचा निर्णय आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या चर्चांनंतर देशभरामध्ये जवळपास १२०० चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख, आलिया जोडीला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्रपटाच्या कमाईतून दिसून येते. शनिवार ३ डिसेंबरपर्यंत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली आहे.शनिवारी या चित्रपटाने ३.५० कोटी कमाई केली. या आकड्यासह गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला कमविला आहे. ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाने ५५.६५ टक्के अधिक कमाई केल्याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श याने दिली. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने शुक्रवारी २.२५ कोटी आणि शनिवारी ३.५० कोटी कमाई केली असून भारतामध्ये या चित्रपटाने आतापर्यंत ५२.७५ कोटींची कमाई केली आहे. ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातून शाहरुख खान आणि आलिया भट्ट पहिल्यांदा पडद्यावर आले असून हा चित्रपट १०० कोटींची कमाई करेल, अशी चर्चा बॉलिवूड वर्तूळात रंगत आहे.

छोटय़ा-मोठय़ा गोष्टींनीही नैराश्य येणाऱ्या या तरुणाईच्या जगाचं कायरा (आलिया भट्ट) प्रतिनिधित्व करते. ती खूप सुंदर आहे. व्यवसायाने सिनेमॅटोग्राफर, वृत्तीने स्वतंत्र, अभिमानी बाण्याची आणि तरीही प्रचंड हळवी आहे. छोट्या मोठ्या जाहिरातींचे काम करणाऱ्या कायराला आपला स्वत:चा चित्रपट करायचा आहे. तिच्याकडे ती संधी चालूनही येते. मात्र ही आलेली संधी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आहे की, ज्याच्याकडून ती आली आहे तो आपल्या प्रेमात असल्याने मिळाली आहे हे तिला कळत नाही. आपल्या रिलेशनशिपबद्दल गोंधळलेली, एकाला नाही- दुसऱ्याला हो म्हणण्याच्या नादात स्वत:कडेच आलेला नकार न पचवू शकलेल्या कायराच्या मनातला गोंधळ दिग्दर्शकाने खूप वेगवेगळ्या प्रसंगांतून आणि विशेषत: कायराच्या वागण्यातूनच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कायराची मित्रमंडळी, तिच्या व्यवसायाचा, जगण्याचा थोडासा हलकाफुलका आणि बराचसा आत्ताच्या पिढीच्या जगण्याच्या जवळ जाणारा परीघ रेखाटला आहे.