सध्या बॉलिवूडमध्ये सतत चर्चेत असणारं कपल म्हणजे अभिनेत्री मलायका आरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. ते दोघे सतत डिनर डेटला जाताना, एकत्र फिरताना दिसतात. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. पण हे कपल कधी लग्न बंधनात अडकणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. सध्या सोशल मीडियावर मलायकाने शेअर केलेल्या फोटोमुळे त्यांचा साखरपुडा झाला अशा चर्चा रंगल्या आहेत. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हातात अंगठी घातलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘अंगठी एखाद्या स्वप्नासारखी आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्यासाठी भेटवस्तू घेऊ इच्छिता तर अंगठी हा उत्तम पर्याय आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिने दिलेले कॅप्शन पाहून मलायका आणि अर्जुनचा साखरपुडा झाला नसून ती एखाद्या ब्रँडचे प्रोमोशन करत असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : ‘बिग बुलचा चांगला रिव्ह्यू देण्यासाठी अभिनेत्रीला पैसे दिले का?’ म्हणणाऱ्याला अभिषेकचे भन्नाट उत्तर

दरम्यान, चाहत्यांनी मलायकाने दिलेले कॅप्शन न पाहाता केवळ फोटो पाहून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा हा फोटो व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

मलायका आणि अर्जुन गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटीक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. बऱ्याचवेळा त्यांचे फोटो पाहून ते लग्न कधी करणार? असा प्रश्न अनेकांना पडतो.