भारतीय चित्रपट जगतात मानाचे स्थान मिळवलेल्या ‘इफ्फी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात २० नोव्हेंबरला होणार आहे. यंदा या महोत्सवाचे ४६ वे वर्ष असून महोत्सवात सुबोध भावे दिग्दर्शित ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटासह चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. गेल्या वर्षी या महोत्सवात तब्बल ११ मराठी चित्रपट दाखवण्यात आले होते. यावर्षी चार मराठी चित्रपटांनी ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात स्थान मिळवत मराठी चित्रपटांचे महोत्सवातील सातत्य कायम राखले आहे.
गोव्यात होणाऱ्या या दहा दिवसीय महोत्सवात इंडियन पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय विभाग, भारतीय आणि विदेशी चित्रपटांचे सिंहावलोकन अशा विविध विभागांतर्गत देशविदेशातील चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागांतर्गत चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ चित्रपटाबरोबर ‘कटय़ार काळजात घुसली’ या संगीत नाटकावर बेतलेला त्याच नावाचा चित्रपट, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेन्स’, सुहास भोसले दिग्दर्शित ‘कोती’ असे चार मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. मराठी चित्रपटांची या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील गेल्या काही वर्षांतील उपस्थिती लक्षणीय ठरली आहे.
‘झी स्टुडिओज’ची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाची महोत्सवासाठी झालेली निवड खूप महत्वाची असल्याचे मत ‘झी स्टुडिओज’च्या मराठी विभागाचे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांनी व्यक्त केले आहे. मराठी चित्रपटाला जगभरातील चोखंदळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इफ्फी’चे मोठे व्यासपीठ अतिशय महत्वाचे आहे. गेल्या तीन वर्षांत ‘फँ ड्री’, त्यानंतर ‘किल्ला’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘लोकमान्य एक युगपुरूष’ आइण ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ असे ‘झी स्टुडिओज’चे चार चित्रपट एकाचवर्षी ‘इफ्फी’त दाखवण्यात आले होते. यावर्षी ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटाच्या निवडीने हॅटट्रिक साधली असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तर भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रतिनिधीत्व करणारा हा चित्रपट ‘इफ्फी’च्या माध्यमातून सर्वदूर पोहोचणार यामुळे समाधान वाटत असल्याचे दिग्दर्शक सुबोध भावे यांनी सांगितले.