‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब पटकावून भारताच्या मानुषी छिल्लरने सर्वांचेच मन जिंकले. जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वांत महत्त्वाची म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. यामध्ये तब्बल १७ वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने बाजी मारली. मानुषीला बऱ्याच गोष्टी बक्षीस स्वरुपात मिळत आहेत. मानुषी मूळची हरयाणाची असल्याने आता हरयाणा सरकारनेही तिला सरकारी नोकरीची ऑफर दिली आहे.

मानुषीने राज्य यंत्रणेतील तिच्या आवडीचा विभाग निवडावा, आम्ही तिला तिच्या पसंतीची नोकरी देऊ, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले. जूनमध्ये मानुषीने ‘एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१७’चा किताब पटकावलेला. त्यावेळी तिने खट्टर यांची भेट घेतली होती. राज्य यंत्रणेत काम करायला आवडेल अशी भावना तिने खट्टर यांच्याकडे व्यक्त केली होती.

वाचा : शाहरुखच्या चित्रपटातून अमित त्रिवेदीची माघार, अजय-अतुलकडे जबाबदारी

हरयाणाची मानुषी आठवडाभरापूर्वी फारशी चर्चेतही नव्हती. पण, १८ नोव्हेंबर हा दिवस तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन गेला. मिस वर्ल्ड या किताबासोबतच मानुषीला इतरही बऱ्याच गोष्टी बक्षीस स्वरुपात मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. जवळपास शंभरहून अधिक देशांतील सौंदर्यवतींशी संवाद साधण्याची संधीही तिला मिळणार आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधीही तिला मिळणार आहे. त्यामुळे मानुषीसाठी खऱ्या अर्थाने उज्ज्वल भवितव्याची दालने खुली झाली आहेत, असे म्हणायला हरकत नाही.