९०व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आणि जगभरातील सिनेमावेडय़ांच्या भुवया उंचावल्या गेल्या, कारण एखादी जगावेगळी कथा, उत्कृष्ट अभिनय, जबरदस्त दिग्दर्शन, संगीत आणि तितकीच मेहनत घेऊन तयार केल्या गेलेल्या चित्रपटांना मिळणारा हा आज सिनेक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेला प्रत्येक जण किमान एकदा तरी ‘ऑस्कर ट्रॉफी’ हातात यावी ही मनीषा मनात बाळगून अभिनयाची तपश्चर्या करतो, परंतु प्रत्येक कलाकार हातात घेण्यासाठी आसुसलेली ही ऑस्कर बाहुली नेमकी तयार होते तरी कशी?

‘अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड फॉर मेरिट’ या अधिकृत नावाने ऑस्कर पुरस्कार सन्मानचिन्ह ओळखले जाते. ‘ब्रिटॅनिअम’ धातूपासून तयार केलेल्या या सन्मानचिन्हाची उंची ३४ सेंमी आणि वजन ३.८५ किग्रॅ असते. या मानचिन्हाचे स्वरूप हातात ‘क्रुसेडर्स’ तलवार घेऊ न उभ्या असलेल्या सरदाराची कलात्मक मूर्ती असे आहे. सन्मानचिन्हाच्या पायाखाली आपल्याला पाच ‘स्पोक’ दिसतात. हे स्पोक लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते आणि तंत्रज्ञ यांचे प्रतिनिधित्व करतात. ‘एम.जी.एम.’चा कलादिग्दर्शक सेड्रिक गिबन्स आणि जॉर्ज स्टॅन्लेने यांनी ऑस्कर सन्मानचिन्हाचे डिझाइन तयार केले आहे. मेक्सिकन चित्रपट दिग्दर्शक एमिलिओ अल इंडिओ फर्नांडिस याची मूर्तीसाठी मॉडेल म्हणून निवड करण्यात आली होती. सुरुवातीला या मूर्तीची प्रतिकृती मातीचा वापर करून तयार करण्यात आली; पण त्यानंतर खरे सन्मानचिन्ह ९२.५ टक्के जस्त आणि ७.५ टक्के तांबे, त्यावर सोन्याचा मुलामा या धातूत तयार केले गेले.

ऑस्कर पुरस्कारविजेत्या व्यक्तीला वा त्याच्या वारसदारांना सन्मानचिन्ह विकायचे असेल तर त्यांनी हा पुरस्कार अ‍ॅकॅडमीला केवळ  एक अमेरिकन डॉलर या किमतीत परत करावा असा नियम सन १९५० नंतर तयार करण्यात आला. पुरेसे कायदेशीर संरक्षण नसल्याने काही वेळा ही सन्मानचिन्हे लिलावात सहा अंकी किमतींना विकली गेलेली आहेत; परंतु विकत घेणाऱ्यांनी ही सन्मानचिन्हे नंतर परत केली. एखाद्या पुरस्कारविजेत्या कलाकाराने कोणत्याही कारणात्सव पुरस्कार नाकारला तर ते सन्मानचिन्ह तसेच ठेवले जाते आणि तो पुरस्कार अन्य कोणालाही प्रदान केला जात नाही.