रेश्मा राईकवार
आपणच शिकार व्हायचं ठरवूनही जंगलात घुसल्यावर माणूसनामक प्राण्याला नेमकं शहाणपण सुधरत नाही. जंगलातला एकेक आवाज टिपत भ्रमंती करताना आपलं किंवा पर्यायाने माणसाचं काही तरी चुकतं आहे एवढं जाणवतं, मात्र नेमकं काय चुकतं आहे, हे लक्षात येत नाही. कोणी कोणाच्या अधिवासावर अतिक्रमण केलं आहे? प्राण्यांनी माणसावर की माणसांनी प्राण्यांवर? हे प्रश्न गेली कित्येक वर्ष तसेच्या तसे माणसांसमोर आ वासून उभे आहेत. त्यातून मग काही जण यावर आपापला मार्ग शोधून काढायचा प्रयत्न करतात, तर अनेक जण अजून तरी हा आपल्या अभ्यासक्रमातील प्रश्न नाही, असं म्हणत दुर्लक्ष करतात. माणूस, जंगल आणि प्राणी या तिढय़ावर वास्तववादी शैलीत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणारा ‘शेरदिल : पीलीभीत सागा’ हा चित्रपटही पुन्हा तेच तेच प्रश्न उपस्थित करतो, मात्र त्यावर कोणत्याही प्रकारे सखोल भाष्य करत नाही.

श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित ‘शेरदिल : पीलीभीत सागा’ हा चित्रपट वास्तवातील घटनांवरून प्रेरित कथेवर आधारित आहे. उत्तर प्रदेशमधील पीलीभीत व्याघ्र प्रकल्प आणि आजूबाजूच्या गावांत घडणाऱ्या घटना या चित्रपटातील कथेच्या केंद्रस्थानी आहेत. जंगलाला लागून असलेल्या गावात वाघ आणि अन्य प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे त्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे. कित्येक वर्ष पीक-पाणी नाही, त्यामुळे पैसा नाही. गावात सुधारणा नाहीत. सरकारचं गावखेडय़ांकडे लक्ष नाही. गरिबी हे आपल्या गावचा विकास न होण्यामागचं मुख्य कारण आहे, असं या गावचा सरपंच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात येऊन, भेटून सांगत राहतो. गावात दुष्काळ आहे, लोकांना खायला अन्न नाही, त्यांच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही कुठल्या तरी सरकारी योजनेंतर्गत गावाला मदत करा.. असं तो तळमळीने सांगत राहतो; पण सरकारी कार्यालयात शब्दांचे कागदी निर्णय फक्त नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत ते म्हणणं पोहोचत नाही. तुमच्या अडचणी काय? अमुक एका विभागाशी तुमच्या गावची अडचण संबंधित आहे ना.. मग त्या विभागाकडे जाऊन तसं लिहून आणा. तुमचा कागद महाजालात सरकवला की आपोआप कधी ना कधी पंतप्रधानांच्या कार्यालयात तुमची समस्या पोहोचून त्यावर निराकरण होणारच, असं फुकाचं आश्वासन देऊन सरकारी अधिकारी गावकऱ्यांना परत पाठवतात. आता ज्या गावात शिक्षणाचा गंधच नाही, त्यांना ऑनलाइन वगैरे शब्द फार परके आहेत. त्यापेक्षा त्यांना कळते ती सुटसुटीत सरकारी योजनांची भाषा.. असाच एका सरकारी योजनेचा कागद या सरपंचाच्या नजरेस पडतो. मात्र इथे गावच्या विकासाची किंमत स्वत:चा जीव देऊनच मिळणार असते; पण सरपंच त्यासाठीही तयार होतो. गावच्या विकासासाठी दहा लाख रुपये मिळावेत, यासाठी आपणच जंगलात जावं आणि वाघाची शिकार व्हावं यासाठी सरपंच स्वत:च्या मनाची तयारी करतो. तो घरच्यांनाही कसंबसं राजी करतो आणि गावकऱ्यांनाही आपल्या योजनेत सामील करून घेऊन जंगलात शिरतो. खरंच सरपंच त्याच्या योजनेत यशस्वी होतो का? किमान तेव्हा तरी सरकारी अधिकाऱ्यांचे डोळे उघडतात का? माणसाचे कायदे त्याला उपयोगी पडो न पडो, जंगलचा कायदा वेगळाच असतो. त्याला फायदा-तोटय़ाचंही लेबल नसतं की खऱ्या- खोटय़ाचंही नसतं. सरपंचाला यातला नेमका कोणता कायदा फळतो? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत गंगाराम सरपंचाची ही कथा रंगत जाते.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी

‘शेरदिल : पीलीभीत सागा’ असं भलंमोठं नाव असलेला हा चित्रपट खरं तर एकपात्री प्रयोग झाला आहे. गंगाराम आणि अचानक त्याला जंगलात भेटलेला शिकारी जिम अहमदचा यांचा एकत्रित जंगल प्रवास वगळता हा चित्रपट फक्त आणि फक्त गंगारामचा आहे. गंगारामच्या मनात सुरू असलेला गोंधळ, त्याच्या मनात जागणारे जंगलचे आवाज, जंगलात शिरल्यानंतर हळूहळू त्याच्यात होत गेलेला बदल आणि एकटय़ाने धैर्याने हे सगळं करत असताना अचानक जिमची झालेली भेट. त्यानंतर जिमचं जगण्याचं अजब तत्त्वज्ञान ऐकत त्याच्याबरोबर चालत राहणारा गंगाराम.. हे सगळे बदल, त्याच्या मनातील स्थित्यंतरं कधी या दोघांच्या आपापसातील संवादातून उलगडत जातात, तर कधी कधी नि:शब्द संवाद आणि जंगलातल्या आवाजातून शब्दांपलीकडचंही असं काही पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी यांनी केला आहे. एक चांगली कथा-कल्पना असलेला हा विषय मूळ लेखनातच पार फसला आहे. जंगलातला अनुभव घेतल्यानंतर गंगाराममध्ये काहीसं अजब शहाणपण आलं असावं असं आपल्याला वाटत राहतं; पण ते एका मर्यादेपलीकडे खरं नाही याचीही जाणीव आपल्याला लवकर होते. अस्तित्वाची लढाई लढताना सरकारी मदत मिळावी यासाठी थेट आपलाच जीव वाघासमोर द्यायला ही मंडळी तयार होतात, हे भयाण दुर्दैव आहे; पण तेही जणू सगळय़ांना नित्याचं झालं असावं इतक्या सपट पद्धतीने ते आपल्यासमोर येतं. किमान सरकारदरबारी तरी या भयाण व्यथेची दखल घेतली जाते का? तसंही होत नाही. तिथे भलत्याच कागदी योजना आणि मानसन्मानाचे तुरे गंगारामच्या गळय़ात पडतात आणि दु:खही त्याच निर्विकार चेहऱ्याने स्वीकारणारा गंगाराम वाटय़ाला आलेलं यश, मानसन्मानही त्याच मर्यादित अर्थाने मिरवत घेतो. त्यातून ठोस भरीव काही कार्य उभारण्याचं बळ त्याच्या अंगी आलं आहे असंही कुठे होत नाही. त्यामुळे ना धड उपहास, ना धड शोकांतिका अशा काहीशा विचित्र आणि उथळ पद्धतीने हा चित्रपट पुढे जात राहतो. त्यातल्या त्यात हा चित्रपट फक्त पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयासाठी पाहावासा वाटतो. पंकज त्रिपाठी यांनी खरोखरच एकटय़ाने हा चित्रपट उचलून धरला आहे. चित्रपटातील गाणी आणि शंतनू मोईत्रा यांचं संगीतही श्रवणीय आहे. शिवाय, जंगलातल्या आवाजांचा वापर दिग्दर्शकाने अनेक ठिकाणी पार्श्वसंगीत म्हणून चपखल वापरला आहे. एक उत्तम चित्रपटाची क्षमता कथेत असूनही हा पीलीभीत सागा फार रंगत नाही, याचं वाईट वाटत राहतं.

शेरदिल : पीलीभीत सागा , दिग्दर्शक – श्रीजीत मुखर्जी , कलाकार – पंकज त्रिपाठी, नीरज काबी, सयानी गुप्ता