टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली फीमेल कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. आता भारती आई होणार आहे. स्वत: भारतीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. पण व्हिडीओमध्ये भारती ‘पण मी कसं सांगू की हे त्याचं बाळ नाही’ असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

भारतीने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर तिला आनंद झाल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती “पण मी कसं सांगू की हे त्याचं बाळ नाही?” असे बोलत असते. त्यानंतर हसत, “आम्हा दोघांचं हे बाळ आहे” असे म्हणते. हर्ष आनंदाने भारतीला मिठी मारतो आणि म्हणतो, ‘बरं झालं भारतीने रेकॉर्ड केलं. आम्ही आई होणार आहोत. सॉरी, भारती आई होणार आहे आणि मी बाबा.’

भारती हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर कलाकारांसोबतच चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्ती मोहन, जय भानूशाली, प्रिन्स नरोला, युवीका चौधरी आणि इतर काही कलाकारांनी कमेंट करत भारतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सिनेसृष्टीची ‘लाफ्टर क्वीन’

सध्या भारती ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्ष लिम्बाचियासोबत धमाल करताना दिसत आहे. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.