रंगभूमीवर एखादं नाटक जिवंत होतं म्हणजे नेमकं काय होतं? एखादी भूमिका कोणी एक कलाकार समरसून जगतो, असं म्हटलं जातं तेव्हा नेमकं त्या कलाकाराने काय जादू केलेली असते? एखादी भूमिका साकारताना कोणत्या विचारप्रक्रियेतून कलाकार जातो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही सर्वसाधारणपणे त्या कलाकारांपाशीच दडलेली असतात. टीव्ही, वृत्तपत्रं ते समाजमाध्यमातून आपण कलाकारांबद्दल वाचलेलं असतं. मात्र अनेकदा ही माहिती त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग, अनुभव यापुरतीच मर्यादित असते. यापलीकडे जात त्या त्या कलाकारांनी नेमके काय प्रयत्न केले, कोणत्या पद्धतीने विचार केला, अशी सविस्तर प्रक्रिया समजून घेऊन ती लोकांसमोर आणणारा ‘रंगपंढरी’ हा अनोखा कार्यक्रम लवकरच यूटय़ूब वाहिनीवर प्रकाशित होणार आहे. योगेश तडवळकर यांच्या संकल्पनेतून उतरलेला ‘रंगपंढरी’ हा उपक्रम म्हणजे एका अर्थी रंगकर्मीच्या समृद्ध कलेचं आकलन करून घेणारा दस्तावेज असून या यूटय़ूब वाहिनीचं उद्घाटन २९ ऑगस्टला मुंबईत समारंभपूर्वक केलं जाणार आहे.

मूळचे मुंबईकर असलेले योगेश तडवळकर हे हौशी नट आणि दिग्दर्शक म्हणून २० र्वष रंगभूमीशी संलग्न आहेत. चेतन दातार, सत्यदेव दुबे, श्रीराम लागू अशा दिग्गजांबरोबर काम करत असतानाच त्यांच्या या नाटय़ाविष्काराचं महत्त्व जाणवलं होतं. हे दिग्गज कलाकार कशा पद्धतीने आपल्या भूमिका वठवतात, काय अभ्यास करतात, त्याचा विचार कसा करतात, या गोष्टी आजपर्यंत कुठंही लिखित किंवा मौखिक स्वरूपात नोंद झालेल्या नाहीत. मात्र त्यांचा अनुभव हा मोठा दस्तावेज आहे, जो पुढच्या पिढीतील कलाकारांना अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे, हे जाणवल्यामुळे ‘रंगपंढरी’ ही संकल्पना डोक्यात आल्याचं योगेश तडवळकर यांनी सांगितलं. योगेश सध्या सिंगापूर येथे व्यावसायिक म्हणून स्थायिक आहेत. मात्र गेल्या वर्षीपासून त्यांनी हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रंगभूमीला आपलं आयुष्य ज्यांनी वाहिलं आहे, अशांच्या सविस्तर मुलाखती घेऊन त्यांच्या नाटय़प्रक्रियेचं- विचारांचं संकलन आणि जतन करणं हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. तसंच या कलाकारांनी अनेक र्वष अभ्यास-साधनेतून जी कला विकसित केली आहे, त्यामागच्या मूलभूत प्रक्रिया- काही सोप्या युक्ती या सगळ्याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी ते यूटय़ूबवरून प्रदर्शित करणे हे मुख्य उद्देश असल्याचं तडवळकर यांनी स्पष्ट केलं. ‘रंगपंढरी’ या उपक्रमांतर्गत विक्रम गोखले, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, मोहन आगाशे, गिरीश ओक या दिग्गज कलाकारांपासून ते मुक्ता बर्वे, सागर देशमुख, उमेश कामत या आत्ताच्या पिढीतील कलाकारांपर्यंत तर दिग्दर्शक म्हणून अमोल पालेकर, विजय केंकरे, मंगेश कदम, मोहित टाकळकर, आलोक राजवाडे, अद्वैत दादरकर अशा नव्या-जुन्या पिढीतील ४० जणांच्या मुलाखती संग्रहित करण्यात आल्या आहेत. या मुलाखती अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी घेतल्या आहेत. या मुलाखतींच्या निमित्ताने आधी कधीच न दिसलेले कलाकार, त्यांचं अनुभवविश्व नव्याने समजून घेता आलं, असं प्रभुलकर यांनी सांगितलं. या कलाकार-दिग्दर्शकांनी हातचं काहीही न राखता आपलं ज्ञान, अनुभव सांगितले आहेत, अशी माहितीही प्रभुलकर यांनी दिली. मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलावंतांच्या अनुभवांचं हे ‘रंगपंढरी’ नावाचं समृद्ध दालन लवकरच रसिकांसाठी खुलं होणार आहे.