अभिनय, गाणं, नृत्य, पाककला, भीती घालवणारे (की वाढवणारे) किंवा मुळातच चिवित्र कल्पनांवर आधारित ‘बिग बॉस’सारखे अनेक रिअ‍ॅलिटी शोजनी हिंदी वाहिन्यांवर आपला जम बसवला आहे. जे हिंदीत खपतं तेच पुढे प्रादेशिकच्याही गळी उतरवलं जातं या न्यायाने हे सगळेच रिअ‍ॅलिटी शो प्रादेशिक वाहिन्यांवरही अवतरले. मराठी वाहिन्याही याला अपवाद नाहीत. मात्र या सगळ्या शोजमध्ये अचानक ज्यांचं पेव फुटलं असं म्हणता येईल ते डान्स रिअ‍ॅलिटी शोज आहेत. वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने लहानथोरांचे डान्स रिअ‍ॅलिटी शोज सुरू आहेत. या शोजमधून गेली काही वर्ष सातत्याने मराठी स्पर्धक, नृत्यदिग्दर्शक यांचा सहभाग लक्षणीय असल्याचे दिसून येते आहे. हिंदी वाहिन्यांबरोबरच हे शोज प्रामुख्याने मुंबईतील असल्याने मराठी कलाकार किंवा होतकरू मराठी नृत्यदिग्दर्शकांची निवड निर्मात्यांकडून केली जाते, असे सांगितले जाते. मात्र आपली निवड सार्थच आहे हे या शोजमधून आपली नृत्यकला पणाला लावून सिद्ध करत या मराठी नृत्यदिग्दर्शकांनी स्पर्धक ते साहाय्यक-मुख्य नृत्यदिग्दर्शक असा प्रवास करण्यात यश मिळवले आहे.

गेल्या काही वर्षांत हिंदी आणि अन्य प्रादेशिक वाहिन्यांवर डान्स रिअ‍ॅलिटी शोचे प्रमाण वाढले असले तरी तुलनेने मराठी वाहिन्या याबाबतीत उदासीन असल्याचे दिसून येते. ‘डान्स महाराष्ट्र डान्स’, ‘एकापेक्षा एक’ या शोजनंतर ‘मॅड’ आणि ‘ढोलकीच्या तालावर’ सारखे एखाद्दुसरे रिअ‍ॅलिटी शोज आपल्याकडे दिसतात. त्यामुळे मराठीत असा एखादा शो केल्यानंतर या स्पर्धकांना नृत्यदिग्दर्शक म्हणून पुढे जायचे असेल तर हिंदीतील डान्स रिअ‍ॅलिटी शोजमध्ये सहभागी होण्याशिवाय पर्याय उरत नाही. याऊलट, हिंदीत इतर शोजप्रमाणे डान्स रिअ‍ॅलिटी शोजही भव्यदिव्य करण्याकडे, बॉलीवूड सेलिब्रिटींना हाताशी धरून या शोजची लोकप्रियता वाढवण्यावर निर्मात्यांचा भर असतो. या शोजसाठी देशभरातील नृत्यकलाकारांना आपल्याकडे खेचून घेण्याचे वाहिन्यांचे प्रयत्न सुरू असतात. आणि या शोजची व्याप्ती पाहता इथे सहभागी होणाऱ्या नृत्यकलाकारांना पुढे जाण्यासाठी अनेक दारे खुली होत असल्याने साहजिकच मराठीतील स्पर्धकांचा या शोजमधला सहभाग मोठय़ा प्रमाणावर वाढतो आहे, असे सध्या या शोजमधून वेगवेगळ्या वाहिन्यांवर आपली नृत्यकला दाखवणाऱ्या मराठमोळ्या स्पर्धकांचे म्हणणे आहे. त्यातील अनेकजण सातत्याने या शोमधून आधी स्पर्धक म्हणून आणि नंतर याच शोसाठी साहाय्यक नृत्यदिग्दर्शक किंवा मुख्य नृत्यदिग्दर्शक असे एकेक पाऊल टाकत पुढे परीक्षकांच्या भूमिकेत समोर येतात. नाहीतर स्वतंत्रपणे मालिका-चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन करताना दिसतात.

समकालीन नृत्यशैलीत निपुण असलेला प्रतीक उतेकर, वैभव घुगे हे दोघेही सध्या नृत्यदिग्दर्शकाच्या भूमिकेत ‘सुपर डान्सर-२’ या डान्सिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसतायेत. त्यांची नृत्यदिग्दर्शनाची शैली उत्तम असल्याने ते दोघेही प्रसिद्धीच्या झोतात आहेत. कधीकाळी अशाच शोजमधून ते स्पर्धक म्हणून वावरले आहेत. प्रतीक हा याआधी ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या मराठी डान्स शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या दोघांशिवाय ‘डान्स इंडिया डान्स’ या शोमधून दिसलेले सिद्धेश पै, मयुरेश वाडकर, वृषाली पाटील यांनी देखील उत्तम कामगिरी करत डान्स शोजमधून बाहेर पडल्यानंतर नृत्यक्षेत्रात आपले नाव कमावले आहे. ‘डान्स महाराष्ट्र डान्स’मुळे मला महाराष्ट्रात ओळख मिळाली असली तरी राष्ट्रीय वाहिन्यांवरील डान्स रिअ‍ॅलिटी शोजमुळे मला माझे नृत्यकौशल्य अधिक मोठय़ा व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली. ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ संपल्यानंतर काय?, हा विचार आला तेव्हा नृत्यात आणखी काही वेगळे प्रयोग करता येतील, या उद्देशाने मी हिंदीतील डान्स रिअ‍ॅलिटी शोजसाठी प्रयत्न केले’, अशी माहिती प्रतीक उतेकरने दिली. आतापर्यंत तीन हिंदी डान्स शोमध्ये नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळल्याने भरपूर काही शिकलो आहे. मराठी वाहिनीवर स्पर्धक म्हणून सुरू झालेला माझा प्रवास सध्या हिंदीतील या नामांकित डान्स शोमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून एक पाऊल पुढे आला आहे. इतक्या मोठय़ा स्तरावर काम करण्याच्या बऱ्याच संधी सध्या या डान्स शोजच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. मराठी मुलांनी आपल्या मेहनतीच्या बळावर त्या हेरण्याची गरज आहे, असे मत प्रतीकने व्यक्त केले.

केवळ होतकरू कलाकारच नाही तर मराठी चित्रपट-मालिका क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही हिंदीतील डान्स रिअ‍ॅलिटी शोजमधून नावलौकिक कमावला आहे. यात सर्वप्रथम सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मराठमोळ्या जोडीने ‘नच बलिये’ या शोचे पहिले पर्व आपल्या नावे केले होते. त्यानंतर अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधवसारखी मंडळी देखील याच मंचावर आपल्या साथीदारांसोबत थिरकताना दिसली. अमृता खानविलकरनेही ‘नच बलिए’चा मुकुट जिंकला. आज ती स्वत: वेगवेगळ्या डान्स रिअ‍ॅलिटी शोजमधून परीक्षकाची भूमिका करते आहे. ‘२ मॅड’ या मराठी डान्स शोची ती परीक्षक होती तर आता झी टीव्हीवर येऊ घातलेल्या ‘डान्स इंडिया डान्स ६’चे सूत्रसंचालन ती करणार आहे. मराठीत नृत्यदिग्दर्शिका म्हणून नाव कमावणाऱ्या फुलवा खामकरनेही ‘डीआयडी – मॉम स्पेशल’मध्ये आपले नशीब आजमावले होते. स्वत: फुलवाने मराठीत डान्स रिअ‍ॅलिटी शोजची स्पर्धक ते परीक्षक असा प्रवास केलेला आहे. याच ‘डीआयडी’शोमधून कधीकाळी स्पर्धक म्हणून वावरलेला धर्मेश येलांडेनेही आपल्या गुरू रेमो डिसूझाबरोबर ‘डान्स प्लस ३’ शोचा परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आणि रेमोच्याच चित्रपटांमधून कामही केलं आहे. मराठी कलाकार असोत किंवा स्पर्धक त्यांनी आपल्या नृत्यकौशल्याच्या बळावर हा मान मिळवला आहे, असे मत फुलवा खामकरने व्यक्त केले.

‘सध्या हिंदी वाहिन्यांवर सुरू असणाऱ्या डान्स रिअ‍ॅलिटी शोमधील मराठी नृत्यदिग्दर्शकांचे काम खरोखर उत्तम प्रकारचे आहे. ‘सुपर डान्सर’ या रिअ‍ॅलिटी शोमधील वैभव घुगे याचे काम आणि त्याची नृत्यदिग्दर्शनाची शैली मला आवडते. ज्याप्रमाणे हिंदीमधील बरीच कलाकार मंडळी गेल्या काही वर्षांत मराठी कलासृष्टीकडे वळली. तसंच मराठीतील कलाकारही हिंदीतील शोजकडे वळले आणि त्यांनी तिथे आपली क्षमताही सिद्ध केली आहे. मराठी डान्स शोमधून स्पर्धक म्हणून पुढे आलेली अनेक मुलं आता हिंदीतील शोमध्ये चांगलं काम करतायेत, असं निरीक्षणही फुलवाने नोंदवलं.

मराठीत डान्स शोचे प्रमाणच कमी असल्याने या क लाकारांनी हिंदीकडे आपला मोहरा वळवला. हिंदीतील या डान्स शोमधून तिथेच साहाय्यक नृत्यदिग्दर्शक किंवा साहाय्यक नर्तक अशा वेगवेगळ्या प्रकारे याच क्षेत्रात कार्यरत राहण्याची संधी त्यांना मिळते. या कलाकारांची प्रचंड मेहनत, त्यांचे नृत्यकौशल्य वाखाणण्यासारखेच असल्याने त्यांना या शोमध्ये नंतरही वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर नियुक्त केले जाते, असे या शोजची आयोजक मंडळी सांगतात. ‘सुपर डान्सर’च्या पहिल्या आणि आता सुरू असणाऱ्या पर्वात आपल्या बहारदार नृत्यदिग्दर्शनाची चुणूक दाखवणारा वैभव घुगे मधल्या काळात ‘डान्स प्लस’ सारख्या शोमध्ये पडद्यामागे राहून साहाय्यक नृत्यदिग्दर्शकाचे काम करत होता. तसेच ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या शोमध्ये आपल्या झोके दार नृत्यकौशल्यासाठी ओळखला गेलेला प्रतीक उतेकरनेही ‘नच बलिये’, ‘झलक दिख ला जा’ या शोसाठी साहाय्यक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्यामुळे इथे केवळ ते मराठी आहेत म्हणून नव्हे तर एकूणच त्यांच्या मेहनतीच्या आणि सादरीकरणाच्या बळावर या शोजमधून आपला मराठी कलाकारांचा टक्का वाढतोय हे या शोजचे आयोजकही मान्य करतात.