‘मोरया’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘रेगे’, ‘झेंडा’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात पोहोचलेल्या संतोष जुवेकरने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटासह मालिका, वेब सीरिज या माध्यमांमध्ये त्याने काम केलं आहे. एवढंच नव्हे तर संतोष जुवेकरने हिंदी सिनेसृष्टीत आपली छाप उमटवली आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याची पुतणी १२वी पास झाली आहे. यासंदर्भात संतोष जुवेकरने खास पोस्ट केली आहे.

अभिनेता संतोष जुवेकरने पुतणी मधुराबरोबरचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. संतोषने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “आमचं पोरगं १२ तप पूर्ण करून आमच्यासाठी द्रोणागिरी पर्वत घेऊन आलंय. आमचं पोरगं पास झालं… नुसतं पास नाही अख्ख्या जुवेकर कुटुंबाचे पूर्वी पासून हरवलेले गुण आणि टक्के एकत्र एकटं घेऊन आलंय. म्हणून तर कुणा एका चित्रपटात बोलून ठेवलंय “म्हारी छोरियां छोरों से कम हैं के” आमची धाकड मुलगी… पिल्लू आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे…खूप खूप अभिनंदन तुला पिल्ल्या…खूप मोठा हो पिल्ल्या हा काका तुझ्याबरोबर आहे…गाणं तुझ्या आवडीचं लावलं हं!”

हेही वाचा – ‘तुजवीण सख्या रे’नंतर गौरव घाटणेकर ‘या’ नव्या मालिकेत झळकणार प्रमुख भूमिकेत, पत्नीची आहे निर्मिती

हेही वाचा – Video: झटपट कशी बनवायची मँगो कुल्फी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितली रेसिपी, पाहा व्हिडीओ

संतोष जुवेकरच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी पुतणी मधुराला शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने प्रतिक्रियेत विचारलं, “संतोष जुवेकरची पुतणी म्हणून सगळे घाबरत असतील ना?” यावर संतोष म्हणाला, “निखळ प्रेम आणि एक मुलगी म्हणून आदर करावा तिचाच नाही तर सर्व मुलींचा…आणि शिकावं तर तिच्या कष्टांकडे आणि तिच्या ध्येयाला बघून. बाकी घाबराव लागलं तर फक्त मला कारण मी तिचा हनुमान तिच्याबरोबर कायम आहे. तुम्ही तुमच्या घरच्या मुलीबरोबर हनुमान बनून राहा. मग सगळेच आदर करतील आपल्या सगळ्या मुलींचा…”

हेही वाचा – शिवाली परबनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने बांधलं हक्काचं घर; फोटो शेअर करत म्हणाला, “स्वप्नातली वास्तू…”

दरम्यान, संतोष जुवेकरच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो हिंदीतील ‘छावा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता विकी कौशलबरोबर संतोष स्क्रीन शेअर करणार आहे. बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. यंदाच्या वर्षाखेरिस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.