मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगमुळे त्यांनी मराठी चित्रपटांमध्येच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही यश मिळवलं. मराठी चित्रपटसृष्टीत विनोदाचा बादशहा म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. नुकतंच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक खास आठवण सांगितली आहे. त्याचा एक व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.

निवेदिता सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केलेले अनेक कलाकारही उपस्थितीत होते. यावेळी त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला.
आणखी वाचा : प्रसिद्ध इन्स्टा स्टारच्या व्हायरल अश्लील व्हिडीओ प्रकरणीच्या ‘त्या’ पोस्टवर मराठी अभिनेत्याची कमेंट, म्हणाला “देव तुला…”

“लक्ष्यामध्ये छोटं मुलंच दडलेलं होतं. तो कधी मोठा झालाच नाही, असं मला वाटतं. तो तसाच होता. कारण मी लक्ष्याला मी स्वत: १० वर्षाची असल्यापासून ओळखते. तो आणि मी लिटिल थिएटर बालरंगभूमीमध्ये बालनाट्यात एकत्र काम करायचो”, असे निवेदिता सराफ म्हणाल्या.

“आम्ही पूर्वी लक्ष्मीकांत बेर्डेचे वीरा देसाई रोडला घर होतं, तर त्याच्या घरी असायचो. त्या काळात मोबाईल फोन नव्हते. त्याच्याकडे टेलिफोन होता. मी तेव्हा तिथून घरी फोन केला होता. मी लक्ष्याकडे आले आहे आणि मला इथून कोणीतरी घरी सोडेल हे मी सांगायला फोन केला होता. मला झुरळाची प्रचंड भीती वाटते. मी फोन केला आणि आईला मी लक्ष्याकडे आले हे सांगितलं. त्यातच एक उडणार झुरळ मी पाहिलं आणि मी जोरात किंचाळले. त्यानंतर मी फोन ठेवला.”

यानंतर लक्ष्या माझ्याकडे आला आणि त्याने मला म्हटलं, “आधी तू तुझ्या घरी फोन करुन सांग की मी झुरळाला बघून घाबरले. नाहीतर आई मी लक्ष्याकडे आलेय असं सांगून तू किंचाळून फोन ठेवलास, तुझ्या आईला माझ्याबद्दल काय वाटेल. आधी तिला फोन कर आणि हे सर्व सांग.” असे निवेदिता सराफ यांनी म्हटले. लक्ष्या हा निरागस बालकच होता, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

आणखी वाचा : “मी निवेदिताची आई बोलतेय, थांबा…” अशोक सराफ यांनी सांगितला लग्नापूर्वी घडलेला ‘तो’ किस्सा

दरम्यान निवेदिता सराफ यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून सर्वजण जोरजोरात हसू लागले. त्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

Story img Loader