‘कुंकू’ मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. छोट्या पडद्यावर अजरामर ठरलेल्या ‘अग्निहोत्र’ मालिकेत सुद्धा मृण्मयीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या मृण्मयीचा आज ३५ वा वाढदिवस आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून मृण्मयीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

मृण्मयी देशपांडेची बहीण गौतमी सुद्धा मराठी कलाविश्वात सक्रिय आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेद्वारे तिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत गौतमीबरोबर अभिनेता विराजस कुलकर्णी झळकला होता. याशिवाय गौतमीने आता रंगभूमीवर सुद्धा स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैयक्तिक आयुष्यात लहानपणापासूनच गौतमीला तिच्या बहिणीकडून मोठा पाठिंबा मिळाला. आज मृण्मयीच्या वाढदिवसानिमित्त गौतमीने खास पोस्ट शेअर करत तिच्या लाडक्या ताईला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : प्रेक्षकांना खळखळून हसवणारा गौरव मोरे झळकणार भयपटात! ‘अल्याड पल्याड’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

गौतमी तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “Happy Birthday ताई! माझ्या कायम पाठिशी उभी राहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू…आय लव्ह यू बाकी सगळं तुला माहितीच आहे.” या पोस्टबरोबर अभिनेत्रीने एक मजेशीर व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओवर गौतमीने “ताई माझी शत्रू आहे पण, ताई माझी लाइफलाइन सुद्धा आहे…कधीकधी ताई मला रडवते…पण, तरीही ताई तू मला खूप आवडतेस. याचसाठी मी एखाद्या लहान बाळाप्रमाणे तुला नेहमी फॉलो करते. आय लव्ह हर टू मच” असे तिने मजेशीर कॅप्शन्स दिले आहेत.

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलीवूड कलाकार दिसणार ‘या’ ड्रेसकोडमध्ये; पाहुण्यांसाठी जेवणाचा मेन्यू आहे खूपच खास

सोशल मीडियावर देशपांडे सिस्टर्सच्या बॉण्डिंगची चांगलीच चर्चा असते. अनेकदा गौतमी बहिणीबरोबर तिचं भांडण कसं होतं, या दोघी एकमेकींना कसा त्रास देतात याचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. यावर त्यांचे चाहते सुद्धा लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. गौतमीने बहिणीच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या आजच्या व्हिडीओचं अमृता खानविलकरसह असंख्य नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. याशिवाय कमेंट्स सेक्शनमध्ये मृण्मयीवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.

दरम्यान, मृण्मयीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ यांच्या जीवनपटात झळकली होती. याशिवाय गौतमी सध्या ‘गालिब’ नाटकात प्रमुख भूमिका साकारत आहे.