मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं वर्चस्व निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अमृताला अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालं. आई ज्योती सुभाष यांच्यासह अनेक ज्येष्ठ कलाकारांकडून अमृताला अभिनयाचे धडे मिळाले. श्रीराम लागूपासून ते नसीरुद्दीन शाहपर्यंत अनेकांनी अभिनेत्रीला कानमंत्र दिले. त्यामुळेच तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. अमृताला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. अशा या प्रसिद्ध अभिनेत्रीची फिल्मी लव्हस्टोरी खूप कमी जणांना माहित असेल. आज आपण अमृता सुभाष व संदेश कुलकर्णी यांची पहिली भेट ते मूल न होऊ देण्याचा निर्णय याविषयी जाणून घेणार आहोत.

अमृता सुभाषचे पती संदेश कुलकर्णी हे सोनाली कुलकर्णीचे सख्खे भाऊ असल्याचं सर्वश्रृत आहे. वयाच्या सतराव्या वर्षी अमृता संदेश यांच्या प्रेमात पडली. ‘हाच तो…’ असं अभिनेत्रीने पहिल्याच भेटीत ठरवलं. पहिल्या भेटीचं निमित्त ठरलं सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस. अमृता व सोनाली या खूप चांगल्या मैत्रिणी. दोघींना अभिनयाची भरपूर आवड. त्यानिमित्ताने दोघींचं एकमेकींच्या घरी सतत जाणं व्हायचं. एकेदिवशी सोनाली यांच्या वाढदिवसानिमित्ताने अमृता शुभेच्छा देण्यासाठी परकर-पोलकं घालून त्यांचा घरी गेली. तिथेच कुर्ता घालून, बाह्या दुमडून संदेश आरशात पाहत उभे होते. ते कुठेतरी जाण्याची तयारी करत होते. त्यांना पाहताच अमृता संदेश यांच्या प्रेमात पडली. ‘हाच तो माझा…’ असं त्या क्षणी त्यांनी ठरवलं.

हेही वाचा – शाहिद कपूरचा संघर्ष: चॉकलेट बॉयची इमेज ते राऊडी हिरो…

या पहिल्या भेटीनंतर अमृता व संदेश यांनी ‘पाटर्नर’ नावाचं नाटक केलं. या नाटकाचं दिग्दर्शन संदेश यांनी केलं होतं. ‘पाटर्नर’मुळे दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. या नाटकानंतर वयाच्या साडे सतराव्या वर्षी अमृताने संदेश यांना थेट लग्नाची मागणीचं घातली. संदेश हे अमृतापेक्षा सहा वर्षांनी मोठे होते. समजूतदार स्वभाव असल्यामुळे त्यांनी आधी तिला समजावलं. या काळात अमृताला ‘एनएसडी’मध्ये (National School Of Drama) पाठवण्याचा विचार सुरू होता. पण संदेश व आपल्यामध्ये दुरावा निर्माण होईल, असा विचार करत ती एनएसडीला जाण्याचं टाळत होती. परंतु संदेश यांनी अमृताला समजावलं आणि एक सल्ला दिला. अमृतानेच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलं. संदेश म्हणाले होते, “एकतर तू लहान आहेस आणि हे वय आता काम करायचं आहे. प्रेमाचा विचार करण्याचं हे वय नाही. त्याच्यामुळे तू एनएसडीला जा. आता तू लहान आहेस. समज, तिथे जर तुला दुसरा कोणी मुलगा आवडला. तर फक्त मला शब्द दिलाय म्हणून तू परत येऊ नकोस. तुला ३ वर्षांनी आतून वाटलं ना तर परत ये, फक्त शब्द दिलाय म्हणून नाही. कारण तू लहान आहेस. हे आकर्षण असू शकतं. त्यामुळे तिथे तू तुझ्या कामाकडे लक्ष दे”. हा मोलाचा सल्ला अमृताने लक्षात ठेवला आणि ती एनएसडीमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली. कालांतराने संदेश यांनी अमृताला लग्नासाठी होकार दिला. मग दोघं काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली.

…म्हणून अमृता व संदेश यांना मुलं नकोय

दोन वर्षांपूर्वी ‘आपलं महानगर’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृताने मूल का नकोय? या मागच्या कारणाचा खुलासा केला होता. “आता काळ बदलत चालला आहे. अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मुलं आवडतात पण त्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यापैकीच एक आम्ही आहोत. मुलं आवडणं आणि ती वाढवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही दोघंही आमच्या आमच्या करिअरमध्ये खूप व्यग्र आहोत. त्यामुळे आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का? आणि त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आमच्या मनात आला. त्यामुळेच आम्ही ठरवलं की आम्हाला बाळ नको. आमच्या कामावर आमचं खूप प्रेम असल्यामुळे ते आम्ही सोडू शकत नाही. तसंच कामावरच्या प्रेमामुळे बाळाकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. आमच्यासारखा विचार करणारे अनेकजण आहेत. परंतु आम्हाला मुलं आवडत नाहीत असा याचा अर्थ होत नाही. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते. मी माझी काम करून मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला जाऊ शकते. मी करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते त्यात बाळाचं संगोपन मला करता आलं असतं का असा प्रश्न मला पडतो. बाळ आवडणं आणि त्याला जन्म देऊन त्याचं चांगलं संगोपन करणं यासाठी खूप ऊर्जा लागते. ही ऊर्जा आमच्यासारख्यांना इतर गोष्टींमध्ये वापराविशी वाटते,” असं अमृता म्हणाली होती.

हेही वाचा – वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट

“आता अनेकजण बदलत्या काळानुसार हा विचार करू लागले आहेत. काळानुसार पूर्णत्त्वाची व्याख्याही बदलली आहे. त्यामुळे एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते किंवा तिच्या असण्याने ती पूर्ण असू शकते. त्याच्यासाठी तिचं लग्न झालं म्हणजे तिचं योग्य झालं, तिला मूल झालं म्हणजे तिचं योग्य झालं, तिचं करिअर झालं म्हणजे तिचं योग्य झालं असं आता राहिलेलं नाही,” असं अमृता सुभाषने म्हटलं होतं.

इंटिमेट सीन करण्यापूर्वी अमृताने केलेला पतीला फोन

आपण आतापर्यंत बऱ्याच चित्रपटात, सीरिजमध्ये अमृताला इंटिमेट सीन करताना पाहिलं आहे. पण पहिल्या चित्रपटात इंटिमेट सीन करण्यापूर्वी तिने पती संदेश यांना फोन केला होता. तेव्हा संदेश यांनी तिला समजावलं की, ‘लाजू नकोस. पडद्यावर लाजून जे काही करशील ते वाईट दिसेल. त्यामुळे मनापासून व्यवस्थित कर. खरं केलंस तरच छान दिसणार. अवघडलीस तर ते वाईटच दिसेल. ही एक भावना आहे. रडायचा सीन नीट करतेस ना. मग या भावनेला वेगळं का ट्रिट करायचं. ते प्रेम आहे.’ त्यानंतर अमृता बऱ्याच चित्रपटात इंटिमेट सीन करताना पाहायला मिळाली. गेल्या वर्षी ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटात अमृताने चांगला मित्र व अभिनेते श्रीकांत यादव यांच्याबरोबर इंटिमेट सीन केले होते. या सीनमुळे श्रीकांत यादव काम करायला तयार नव्हते. एका चांगल्या मैत्रिणीबरोबर पडद्यावर इंटिमेट सीन करणं, त्यांना चुकीच वाटतं होतं. पण संदेश यांनी श्रीकांत यांना फोन करून समजावलं. चांगली भूमिका आहे म्हणून कर, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या शब्दाखातर श्रीकांत यांनी अमृताबरोबर ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये इंटिमेट सीन केले.