नव्वदच्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रिया बेर्डेंना ओळखले जाते. नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये त्या सक्रिय आहेत. प्रिया बेर्डे यांनी एकेकाळी सिनेसृष्टी गाजवली असली, तरी सध्या त्या सिनेसृष्टीतील कलावंतांसाठी झटत आहेत. यासाठीच त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. नुकतंच एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी राजकारणात येऊ दिलं नसतं, असे स्पष्टपणे सांगितले आहे. प्रिया बेर्डे यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द कशी सुरु झाली? यामागे नेमकं कारण काय होतं? यांसह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांना जर लक्ष्मीकांत बेर्डे असते, तर त्यांनी तुम्हाला राजकारणात येऊ दिले असते का? असा प्रश्न विचारला. यावर प्रिया बेर्डे यांनी थेट उत्तर दिले.आणखी वाचा : “फक्त १३ दिवस लोक येतात, त्यानंतर…” प्रिया बेर्डेंनी मांडली सत्य परिस्थिती, म्हणाल्या “लक्ष्मीकांत गेल्यानंतर…” "पहिली गोष्ट म्हणजे जर लक्ष्मीकांत बेर्डे आज असते तर त्यांनी मला राजकारणात येऊच दिलं नसतं. त्यांनी सांगितलं असतं की बाई, तू तुझा संसार सांभाळ, करिअर बघ, पण या भानगडीत पडू नकोस. कारण तो तुझा स्वभाव नाही. तुझा स्वभाव फटकळ आहे आणि इतकं स्पष्ट बोलणारी राजकारणात कशी काय असू शकते. पण माझं म्हणणं आहे की मी राजकारण म्हणून काम करत नाही. मी सांस्कृतिक विभागासाठी काम करते. मी कलाकारांसाठी काम करते, हे माझे उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे", असे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. आणखी वाचा : “लक्ष्मीकांत गेल्यानंतर नाईलाज म्हणून मुलांना…”, प्रिया बेर्डेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या “माझ्या सासरची मंडळी…” दरम्यान प्रिया बेर्डे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधलं होतं. पण त्यानंतर अवघ्या दोन-अडीच वर्षांत त्यांनी राष्ट्रवादीला राम राम करत भाजपामध्ये प्रवेश केला. सध्या त्या भाजपच्या राज्य सांस्कृतिक प्रकोष्टच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.