पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा १६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. या जोडप्याच्या साखरपुड्याला जवळचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. येत्या काही दिवसात अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. पूजाच्या घरी नुकताच व्याही भोजन व मानपानाचा कार्यक्रम पार पडला आहे. लग्नघरातील सुंदर असे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

पूजा व सिद्धेश यांच्या लग्नाआधीच्या विधींना आता सुरुवात झालेली आहे. सावंतांच्या घरी खास व्याही भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पूजा पारंपरिक लूक करून तयार झाली होती. जांभळ्या रंगाची साडी, सुंदर हार, मोकळे केस या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.

हेही वाचा : मराठमोळी अभिनेत्री झळकणार इंग्रजी नाटकात; याआधी शाहरुख व आमिर खानबरोबर केलंय काम, कोण आहे ती?

व्याहीभोजनाच्या कार्यक्रमाला पूजाच्या सासरचे सगळे लोक उपस्थित होते. तिचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमल्यामुळे पूजाच्या सासरी नेमकं कोण-कोण असतं याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर पूजाने माहेर अन् सासरच्या मंडळींसह एकत्र फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : शाहरुख व गौरी खानने तीन पद्धतीने केलं होतं लग्न, प्रसिद्ध निर्मात्यांनी सांगितला किस्सा; म्हणाले, “त्यांच्या लग्नात…”

पूजाच्या होणाऱ्या दीराचं नाव आशिष चव्हाण असून तिच्या जाऊबाईचं नाव डायना डिक्रुझ असं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्याहीभोजनाच्या फोटोंमध्ये तिच्या सासू-सासऱ्यांची देखील झलक पाहायला मिळत आहे. यावेळी पूजाच्या आईने तिच्या सासूबाईंची व जावेची परंपरेनुसार ओटी भरली. या सोहळ्याचे सुंदर असे फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

दरम्यान, पूजा व सिद्धेश आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. तसेच पूजा नुकतीच ‘मुसाफिरा’ चित्रपटात व एका बॉलीवूड गाण्यात झळकली होती.