शाहरुख व गौरी खान या दोघांना बॉलीवूडमधील आदर्श जोडी म्हणून ओळखलं जातं. या दोघांनी ऑक्टोबर १९९१ मध्ये लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. काही महिन्यांपूर्वीच किंग खानने त्याच्या लग्नाचा ३२ वा वाढदिवस साजरा केला. शाहरुख-गौरीची लव्हस्टोरी अलीकडच्या बॉलीवूड स्टार्सपेक्षा काहीशी हटके आहे. चित्रपट निर्माते विवेक वासवानी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखच्या लग्नातील अनेक किस्से सांगितले.

शाहरुख-गौरीच्या विवाहसोहळ्याला निर्माता विवेक वासवानी यांनी खास उपस्थिती लावली होती. सिद्धार्थ कन्ननशी बोलताना निर्माते विवेक म्हणाले, “शाहरुखचं लग्न झालं तेव्हा त्याच्याकडे स्वत:चं घर नव्हतं. लग्नाआधी तो आमच्या घरी राहत होता. त्यामुळे लग्नाचं गिफ्ट म्हणून या नवविवाहित जोडप्याला मी पाच दिवसांसाठी हॉटेल बुक करून दिलं होतं. त्यानंतर शाहरुख-गौरी निर्माते अझीझ मिर्झा यांच्या एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेले.”

हेही वाचा : Video : सुंदर समुद्रकिनारा, पारंपरिक लूक अन्…; मुग्धा-प्रथमेशने शेअर केला खास व्हिडीओ, दोघांच्या साधेपणाचं होतंय कौतुक

निर्माते पुढे म्हणाले, “शाहरुखचं लग्न झाल्यावर आम्हाला ‘राजू बन गया जेंटलमन’ चित्रपटासाठी एक शीर्षक गीत शूट करायचं होतं म्हणून आम्ही सगळे गौरीला घेऊन दार्जिलिंगला गेलो होतो. शूटिंग संपल्यावर आम्ही मुंबईत परतलो त्यावेळी शाहरुख पुन्हा आमच्या घरी राहू शकत नव्हता. म्हणून अझीझ मिर्झा यांच्या एका अपार्टमेंट ते दोघेही राहू लागले.”

हेही वाचा : लगीनघाई! प्रथमेश परबला लागली क्षितिजाच्या नावाची हळद, फोटो आले समोर

“शाहरुख खानच्या लग्नाबद्दल सांगताना विवेक वासवानी म्हणाले, त्यांच्या लग्नात खूप मस्त जेवण होतं. मी, अझीझ मिर्झा, शाहरुखचे बालपणीचे मित्र, गौरीचा भाऊ असे आम्ही सगळेजण त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. त्या दोघांनी हिंदू आणि मुस्लीम परंपरेनुसार लग्न केलं यानंतर शाहरुखने नोंदणीकृत लग्न देखील केलं. त्याने एकाच दिवशी तीन पद्धतीने लग्न केलं.” असं विवेक वासवानी यांनी सांगितलं.

शाहरुख खानच्या संघर्षाच्या काळात निर्माते विवेक वासवानी यांनी अभिनेत्याला प्रचंड मदत केली होती. त्यामुळे किंग खानच्या यशात त्यांचा सर्वाधिक वाटा असल्याचं बोललं जातं. याबद्दल स्वत: शाहरुखने देखील अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.