मराठी मनोरंजनसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक असलेला आघाडीचा कलाकार म्हणजे प्रसाद ओक. प्रसादने आपल्या अभिनयाच्या जोरावर या सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. अशा हरहुन्नरी अभिनेत्याने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात अवघड प्रसंगाविषयी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच सुरू झालेल्या ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता. यावेळी प्रसादने तो अवघड प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “करोनाची पहिली लाट येऊन गेली होती. आपण सगळेच भयानक, अनामिक भीतीमध्ये जगत होतो. थोडी करोनाची झळ कमी झाल्यानंतर सरकारने बायो-बबलमध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी दिली. पण त्याकरता मुंबई बाहेर जाणं फार गरजेचं होतं. जेणेकरून एक युनिट त्या बायो-बबलमध्येच राहिल. म्हणजे त्या युनिटमधील एकही माणूस त्या जागेतून बाहेर जाणार नाही आणि नवा एकही माणूस त्या जागेत आत येणार नाही. अशा पद्धतीने त्या कामाचे नियम सरकारने बनवले होते. ते अगदी जसेच्या तसेच नियम पाळत ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’चं पूर्ण मोठं युनिट मुंबई सोडून दमणला पोहोचलं.”

हेही वाचा – “आयुष्यात कधी भिणार नाही”, ट्रोलिंगविषयी प्रसाद ओकने मांडलं परखड मत, म्हणाला…

पुढे प्रसाद म्हणाला, “दमणमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हास्यजत्रेचा सेट बांधला होता. तिथेच आम्ही चित्रीकरण करणार होता. २९ एप्रिलला आम्ही दमणमध्ये पोहोचलो. सगळे सेटल झालो आणि ३० एप्रिलला तिथल्या शेड्यूलप्रमाणे पहिला एपिसोडचं सकाळी ९ वाजता चित्रीकरण सुरू होणार होतं. आम्ही सकाळी ६, ७ वाजता उठलो. आवरायला लागलो. उठून जरा फ्रेश झाल्यानंतर बघितलं तर बायकोचे ८ ते १० मिस्डकॉल होते. मी झोपलो होतो. मी उठल्यानंतर ते पाहिलं. मग मी फोन केला. तिने मला सांगितलं की, माझे वडील गेले.”

हेही वाचा – “अत्यंत थर्ड क्लास…”, इन्फ्लुएन्सर्सना ‘अ‍ॅक्टर्स’ समजण्याबाबत प्रसाद ओकने मांडलं स्पष्ट मत, म्हणाला…

“मुळात मी पुण्याचा असल्यामुळे पुण्यात खूप चांगले मित्र आहेत. ओळखी आहेत. एका मित्राच्या माध्यमातून त्यावेळेचे पुण्यातील वैद्यकीय अधिकारी होते, त्याच्याशी संपर्क झाला. मी त्यांना सांगितलं, माझे वडील आहेत. तर आपण काय करू शकतो? तर ते म्हणाले, साहेब परिस्थिती भयंकर वाईट आहे. अर्धा तास, पाऊण तास ठेवण्याची आम्हाला परवानगी आहे. जास्तीत जास्त तुम्ही मला फोन करताय, विनंती करताय म्हणून १५ मिनिट किंवा अर्धा तास एवढाच वेळ ठेवू शकतो. पण तुम्ही आता दमणला आहात आणि आता ते पुण्यात आहेत. पुण्यात यायला तुम्हाला कमीत कमी ६ ते ७ तास लागतील. एवढा वेळ आम्ही ठेवू शकत नाही. भयंकर दबाव आहे. परिस्थिती खूप बिकट आहे. मी काहीच करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर प्रश्नच नव्हता पुण्याला येण्याचा. एकतर प्रवास करताना खूप बंधन होती. त्यावेळी आपण सहज प्रवास करू शकत नव्हतो. एवढं करून ते ठेवणार नव्हतेच. म्हणून मी त्यांना विनंती केली की, भाऊ व्हिडीओ कॉल लावेल शेवटचं वडिलांना बघू दे. ते म्हणाले, नाही साहेब. इथे मोबाइल आणण्याची परवानगी नाहीये. तुमचे भाऊ मोबाइल बाहेर ठेऊन आलेत. त्यामुळे तेही शक्य नाही. मी म्हटलं, तुमच्याकडे असेल, तुमच्या फोनवरून व्हिडीओ कॉल लावता का? ते म्हणाले, मला परवानगी नाहीये. मी नाही करू शकत. त्यामुळे मी शेवटचं वडिलांना पाहिलंच नाही. थोड्यावेळाने भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो,” असं प्रसाद म्हणाला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak told the story of his father death during to corona virus pandemic pps