न्यू यॉर्कमध्ये जन्मलेली आणि तिथेच स्थायिक असलेली अभिनेत्री देविका भिसे ही हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ या चित्रपटाद्वारे हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. अंकगणिततज्ज्ञ एस रामानुजन ह्यांच्या चरित्रावर बनलेल्या ह्या चित्रपटात देव पटेल हा रामानुजन ह्यांच्या भुमिकेत आहे. तर रामानुजन ह्यांची पत्नी जानकी यांची भुमिका देविकाने साकारली आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
देविकाने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी गायन आणि अभिनयास सुरुवात केली. तसेच, तिने भरतनाट्यम, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि जॅझ या गायनप्रकाराचे प्रशिक्षण घेतलेले आहे. २५ वर्षीय देविका ही मराठी, इंग्रजी, हिंदी, इटालियन, फ्रेन्च या भाषा अस्खलितपणे बोलू शकते. चित्रपटातील जानकीच्या भूमिकेसाठी देविकाने अय्यंगर ब्राम्हणांच्या संस्कृतीचे, श्लोकांचे आणि त्यांच्या भाषेचे ज्ञान घेतले. तसेच, तिने त्यांच्या देहबोलीवरही अभ्यास केला. ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ या चित्रपटाचे चित्रिकरण चेन्नईत करण्यात आलेले आहे.