रितेश बात्रा दिग्दर्शित ‘लंचबॉक्स’ या सिनेमाला ‘कान’ महोत्सवातील ‘क्रिटिक्स वीक व्ह्यूअर्स चॉईस’ पुरस्कार सध्या सुरू असलेल्या ६६ व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळाला आहे.
इरफान खान, नवाझुद्दिन सिद्दिकी यांच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमाला कान  महोत्सवातील प्रेक्षकांनी एकमताने गौरविले. ‘लंचबॉक्स’ सिनेमाला कान्समध्ये पहिलावहिला पुरस्कार मिळाल्याचे समजले त्याबद्दल खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया इरफान खानने ट्विटरवरून व्यक्त केली आहे.
‘अग्ली’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘मान्सून शूटआऊट’ आणि ‘लंचबॉक्स’ असे चार चित्रपट कान महोत्सवात दाखविण्यात येत आहेत. अनुराग कश्यप तीन चित्रपटांचा निर्माता आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘अग्ली’ या चित्रपटात  मराठी अभिनेता-लेखक गिरीश कुलकर्णी प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘अग्ली’ला ‘कान’च्या प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.  
दरम्यान, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना ‘नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अॅण्ड लेटर्स’ हा किताब देऊन फ्रेंच सरकारने गौरविले.