बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत ही आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. मुंबई पोलिसांनी एका प्रकरणात कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांना समन्स जारी करत पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितलं होतं. परंतु आपल्या भावाच्या लग्नकार्यात व्यस्त असल्याचं सांगत दोघांनीही पोलीस ठाण्यात हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा कंगना आणि रंगोली या दोघांनाही समन्स पाठवलं होतं. तसंच १० नोव्हेंबरपर्यंत वांद्रे पोलीस स्थानकात हजर होण्यास सांगितलं होतं. परंतु पुन्हा एकदा त्या दोघांनी याला नकार दिला.
आज (१० नोव्हेंबर) कंगनाच्या भावाचं लग्न आहे. यामुळे कंगना आणि रंगोल चंदेल या दोघांनी पोलिसांसमोर हजर राहण्यास नकार दिला.

रिपोर्ट्सनुसार आपल्या भावाच्या लग्नानंतरच आपण पोलिसांसमोर हजर राहू शकतो, असं दोघांकडून सांगण्यात आलं आहे. कंगना रणौत आणि रंगोली चंदेल यांनी कथितरित्या सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस आणि मुंबईवर केलेल्या टीकेवरून त्यांना हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. टाईम्स नाऊनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वांद्रे पोलिसांनी कंगना रणौत आणि रंगोल चंदेल यांना २१ नोव्हेंबर रोजी पहिली नोटीस पाठवली होती. तसंच त्यांना आपला जबाब नोंदवण्यास सांगितलं होतं. परंतु कंगनाच्या वकिलानं याबाबत उत्तर देत सध्या ती हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या भावाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याचं सांगितलं होतं. तसंच यामुळे ती पोलिसांसमोर हजर राहू शकत नसल्याचंही म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु यालाही त्यांनी नकार दिला. तसंच आपण १५ नोव्हेंबरनंतर चौकशीसाठी हजर राहू शकतो, असंही तिनं नमूद केलं आहे.

… त्यांनी मला ब्लॉक करावं

“माझे जे चाहते आहेत जे सतत माझी ट्वीट पाहत असतात आणि मी कंटाळलोय, थकलोय असं म्हणत मला शांत राहण्यास सांगतात, त्यांनी मला म्यूट करावं किंवा अनफॉलो करावं. जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्ही वेडेपिसे आहात. माझ्यावर द्वेषानं प्रेम करू नका. जर तुम्हाला यापेक्षा चांगला काही माहित नसेल तर तुम्ही ते करू शकता,” असं ट्वीट कंगनानं केलं आहे.