अभिनेत्री आणि मंटो या सिनेमाची दिग्दर्शिका नंदिता दास हिच्या वडिलांवरही लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. #MeToo या मोहिमेत आता नंदिता दासचे वडिल जतिन दास यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. जतिन दास हे सुप्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांच्यावर नीशा बोरा नावाच्या मुलीने आरोप केले आहेत. दिल्लीमध्ये जतिन दास यांना मी एका कौटुंबिक सोहळ्यात भेटले होते. माझे सासरे त्या कार्यक्रमात मला घेऊन गेले होते. इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये हा कार्यक्रम होता. नीशा बोराने केलेल्या ट्विटनुसार जतिन दास यांनी तिला काही दिवसांसाठी असिस्ट करायला सांगितलं. मी त्यांना मदत करण्यास तयार झाले. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावले.

मी दिल्ली येथील त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी मला जवळ बोलावले आणि मिठी मारली. तसेच बळजबरीने माझे चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला असाही आरोप नीशा बोराने केला आहे. तो प्रसंग आठवला तरीही माझ्या अंगावर काटा येतो. आणखी एकदा मी त्यांच्या घरी गेले तेव्हा ते व्हिस्की पित होते. त्यांनी मलाही थोडी घेण्यास सांगितले. मात्र मी नकार दिला. पुन्हा त्यांनी तसाच प्रकार माझ्यासोबत केला. मी त्यांना झटकले, मात्र त्यांनी मला बोलावले. मला तो प्रसंग आठवला तरीही त्रास होतो. एखादा चाकू पाठीत खुपसला जावा तसा त्रास होतो इतक्या त्या आठवणी वाईट आहेत असेही नीशाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

#MeToo ही सोशल मीडियावरची चळवळ भारतात अभिनेत्री तनुश्री दत्ताने सुरु केली. दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला. तिच्यानंतर अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. #MeToo प्रकरणात आत्तापर्यंत आलोकनाथ, चेतन भगत, विनोद दुआ, लव रंजन, कैलाश खेर, साजिद खान यांच्यासह अनेकांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.