उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी देशातून निघून जावे अन्यथा आमच्या मार्गाने त्यांना देशातून हाकलून लावू, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे दिला होता. त्याचाच परिणाम म्हणजे ‘झी जिंदगी’ या वाहिनीवरील पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करण्याचा निर्णय शनिवारी झी समूहाने घेतला. दरम्यान, पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता मार्क अन्वरने भारताविरुद्ध गरळ ओकल्याने त्याला ब्रिटीश वाहिनीने कार्यक्रमातून हाकलले आहे.
मार्क अन्वर या ४५ वर्षीय अभिनेत्याने काश्मिर प्रश्नावरून भारतीयांविरोधात अनेक वाईट विधाने ट्विटरद्वारे केली होती. मार्क हा ब्रिटनच्या ‘कोरोनेशन स्ट्रीट शो’मध्ये शरीफ नजीरची भूमिका साकारत होता. मात्र, त्याने ट्विटरवरून भारतीयांविरोधात इतके घाणेरडे आणि गलिच्छ ट्विट केले की आयटीव्ही चॅनलने त्याचे ट्विट्स वर्णभेदी असल्याचं सांगत त्याला कार्यक्रमामधून हाकलवून लावले. ‘संडे मिरर’ या वृत्तपत्राने मार्कने केलेल्या वर्णभेदी ट्विट्सबाबत आयटीव्ही नेटवर्कला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले. काश्मीर प्रश्नी भारतावर आरोप आणि भारतात पाकिस्तानी कलाकारांना होणारा विरोध यासंबंधी मार्कने केलेल्या ट्विटसचा स्क्रिनशॉट मिररने प्रसारित केला.
पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता मार्क अन्वरने ‘कॅप्टन फिलीप्स’ आणि ‘द ५१एसटी स्टेट’ या प्रसिद्ध चित्रपटांमध्येही काम केले आहे.