‘क्वांटिको’ आणि ‘बेवॉच’ यासारख्या मोठ्या प्रोजेक्टसमुळे बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव एव्हाना हॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी परिचित झाले आहे. अमेरिकन टेलिव्हिजनवरील ‘क्वांटिको’ या मालिकेत प्रियांकाने साकारलेल्या ‘एफबीआय’ एजंटच्या भूमिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. याच मालिकेचे दुसरे पर्व आता सुरू होत आहे. यासाठी प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये प्रियांकाचा वरचष्मा दिसत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमधील प्रियांका प्रोमोमध्ये आपल्या अन्य सहकाऱ्यांबरोबर दिसत आहे. या मालिकेसाठी प्रियांकाला २०१६ सालचा पीपल्स चॉईस अॅवॉर्डही मिळाला होता. याच मालिकेचे दुसरे पर्व येत्या रविवारपासून सुरू होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने हॉलीवूड अभिनेता ड्वाइन जॉन्सन सोबत ‘बेवॉच’ या आगामी हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती.