Allu Arjun Pushpa 2 Teaser : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. याशिवाय पुष्पा अन् श्रीवल्लीची केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘पुष्पा: द राइज’च्या यशानंतर आता लवकरच ‘पुष्पा २ : द रुल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार? याबद्दल गेले कित्येक दिवस चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. सेटवरचे बरेच फोटो, पोस्टर बघून प्रेक्षकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली होती आणि आता अखेर बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ ची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.

‘पुष्पा २’ चा पहिला टीझर ८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अल्लू अर्जुनचं रौद्ररुप पाहायला मिळतंय. अभिनेता चक्क विविध भरजरी दागिने, साडी नेसून, गळ्यात लिंबाची माळ, हारतुरे, कानात मोठे झुमके घालून अवतरल्याचं या टीझरमधून समोर आलं आहे.

हेही वाचा : Pushpa 2 teaser: ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत श्रेयस तळपदेची खास पोस्ट, म्हणाला…

चेहऱ्यावर रंगरंगोटी करून हातात अंगठ्या, दागिने आणि एका हातात बंदुक पकडलेल्या पुष्पाचा लूक पाहून चाहत्यांनी या टीझरवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण १ मिनिट ८ सेकंदाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना एकही संवाद ऐकायला मिळत नाही. सगळं लक्ष अल्लू अर्जुनवर केंद्रीत करण्यात आलं आहे. ‘पुष्पा २’ मध्ये प्रेक्षकांना भरभरून अ‍ॅक्शन पाहायला मिळेल हे टीझरमुळे स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेत ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री! अर्जुन-सायलीच्या नात्यावर काय परिणाम होणार? पाहा प्रोमो

दरम्यान, अल्लू अर्जुन ८ एप्रिल रोजी आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. याच खास प्रसंगी पुष्पा २ चा टीझर चाहत्यांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे. याआधी ५ एप्रिलला रश्मिका मंदानाच्या वाढदिवशी मेकर्सनी तिचा चित्रपटातील पहिला लूक रिलीज केला होता. बहुचर्चित ‘पुष्पा २’ यावर्षी १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.