गेल्या वर्षी २०१६ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारे संबंध बऱ्याच कारणांनी विकोपास गेले आणि त्याचा परिणाम विविध क्षेत्रांवर झाला. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावाच्या वातावरणाचा सर्वात जास्त परिणाम झाला तो म्हणजे कलाक्षेत्रावर. भारतीय चित्रपट आणि कलाक्षेत्रामध्ये पाकिस्तानी कलाकारांच्या वावरावरही या सर्व घटनांमुळे चाप बसला. किंबहुना पाकिस्तानी कलाकारांना भारतात कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी घालण्यात आली. असे असले, तरीही काही कलाकारांनी मात्र आजही या दोन्ही राष्ट्रांमधील संबंध सुधारण्याची आशा व्यक्त केली आहे. प्रसिद्ध सुफी गायक राहत फतेह अली खान यांनी नुकतेच भारत-पाकिस्तानमधील सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध कायम जपले गेले पाहिजेत अशी आशा व्यक्त केली आहे.

‘मी आशी आशा करतो की, सध्याची ही परिस्थिती लवकरच सुधारेल. ही गोष्ट खरी आहे की दोन्ही देशांमध्ये ही जी काही अशांततेची परिस्थिती उद्भवली होती ती दु:खदायक होती’, असे राहत फतेह अली खान यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दुरध्वनीवरुन दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. राहत फतेह अली खान यांच्या गायनशैलीला भारतीय प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर दाद देतात. सध्या ते ‘सावरे’ या गाण्याद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. भारतीय संगीतकार- गीतकार अनुपमा रागच्या साथीने राहत यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे. टाइम्स म्युझिकमध्ये नुकतेच या गाण्याच्या व्हिडिओचे अनावरण करण्यात आले. राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील हे गाणे अभिनेता कुणाल खेमूवर चित्रित करण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता आता राहत फतेह अली खान यांच्या या गाण्याला भारतीय प्रेक्षकांचे प्रेम मिळते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याविषयी आणखीन बोलताना राहत फतेह अली खान म्हणाले, ‘कलाकारांचे काम कधीच थांबत नाही. मला नाही वाटत की या गाण्याचा विरोध करण्यात येईल. आम्ही (कलाकारांनी) नेहमीच प्रेमाच्या मार्गाची निवड केली आहे. पण, काहीजण या दोन राष्ट्रांमध्ये असणारा हा प्रेमळ दुवा नष्ट करु पाहात आहेत’.

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

दरम्यान, एका नव्या म्युझिक व्हिडिओच्या निमित्ताने राहत फतेह अली खान यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी त्यांच्या या आगामी गाण्याच्या व्हिडिओचे चित्रण लखनऊ येथे करण्यात आले होते. पण, हे गाणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा प्रदीर्घ काळ लागला आहे. यामागे दहशतवादी कारवायांचे कारण असू शकते का? असा प्रश्न जेव्हा राहत यांना विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले, व्हिडिेओ बनविण्यासाठी वेळ लागतो. पोस्ट प्रोडक्शन आणि अशा बऱ्याच प्रक्रियांचा त्यात समावेश असतो. त्यामुळेच व्हिडिओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतका वेळ लागला असावा. राहत फतेह अली खान यांनी मोठ्या हुशारीने या प्रश्नाचे उत्तर दिल्याची चर्चाही सध्या रंगत आहे.

भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाचे वातावरण असले तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही राहत फतेह अली खान यांच्या गायकीला भारतीय प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तान कोक स्टुडिओच्या एका पर्वात गायलेल्या त्यांच्या एका गाण्याने संगीतप्रेमींना भुरळ घातली आहे. नुसरत फतेह अली खान यांनी गायलेल्या ‘आफरीन आफरीन’ या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन राहत फतेह अली खान यांनी पाकिस्तानी गायिका मोमिना मुन्तेहसनसोबत गायले होते. या गाण्याचे बोल आणि राहत- मोमिना यांच्या आवाजाची जादू संगीतप्रेमींना गारद करण्यात यशस्वी झाली होती.