मुंबई सेंट्रल स्थानकात शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

संध्याकाळची पाच-साडेपाचची वेळ मुंबई सेंट्रलच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटण्याच्या स्थानकात नेहमीच गर्दीची वेळ असते. राजधानी, ऑगस्ट क्रांती राजधानी, फ्लाइंग राणी, वलसाड पॅसेंजर अशा गाडय़ा एकामागोमाग एक सुटत असल्याने प्रवाशांची गर्दी उसळलेली असते; पण सोमवारी मुंबई सेंट्रलच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठीच्या स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक पाच वाजल्यापासूनच गर्दीने फुलला होता.  दर दिवशी बरोबर ५.४०च्या ठोक्याला प्लॅटफॉर्म सोडणारी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस पावणेसहा उलटून गेले, तरी प्लॅटफॉर्मवरच उभी होती. गर्दी वाढत होती आणि एवढय़ात ‘तो आला, बघा.. तो आला’ असा एकच गलका झाला. बॉलीवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान झटक्यात गाडीच्या ‘एच-ए१’ या डब्यात चढला आणि गाडी क्षणाचाही विलंब न लावता सुटली. रेल्वेच्या ताफ्यातील सर्वात प्रतिष्ठेची ही ‘राजधानी’ बॉलीवूडच्या या बादशाहसाठी तब्बल आठ मिनिटे खोळंबली.

‘रईस’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई ते दिल्ली यांदरम्यान राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणार असल्याचे शाहरुख खानने ट्वीट केले होते. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजल्यापासूनच मुंबई सेंट्रल स्थानकात गर्दी केली होती. शाहरुख खानसह या गाडीतून काही कलाकार आणि काही पत्रकारही जाणार असल्याने वातानुकूलित टू-टीअर श्रेणीचे दोन डबे आरक्षित केले होते. शाहरुखसह सनी लिओनी, फरहान अख्तर हेदेखील प्रवास करणार असल्याने चाहत्यांसाठी मुंबई सेंट्रलच्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक ‘रेड कार्पेट’ बनला होता.

लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी, जमल्यास त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी शाहरुखचा लांबून का होईना एक फोटो घेण्यासाठी चाहते पादचारी पुलापासून स्टॉलच्या टपावर जागा मिळेल तिथे उभे होते. शाहरुखचे आसन ‘ए-५’ या डब्यात आरक्षित होते. यावेळी आरक्षण यादीचे छायाचित्र घेण्यासाठीही एकच गर्दी उसळली होती. काही खासगी अंगरक्षक ही गर्दी डब्याच्या दरवाज्यावरच थोपवत होते.

‘ए-५’ या डब्याच्या बाहेर शाहरुखची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांचा अखेर हिरमोडच झाला. ५ वाजून ४७ मिनिटांनी शाहरुखने प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. निळा शर्ट आणि काळा कोट घातलेल्या शाहरुखने शेवटी असलेल्या ‘एच-ए१’ या डब्यात प्रवेश केला आणि ५.४८ वाजता गाडी सुटली. डब्याच्या खिडकीच्या काचेला हात टेकवून शाहरूख चाहत्यांना निरोप देत होता.

चिकन तंदुरी, रसमलाई आणि आलू-गोबी

‘राजधानी’त दर दिवशी पनीर आणि चिकन यांचा एकच पदार्थ बनवतात, पण सोमवारी शाहरूख खान या गाडीतून प्रवास करणार असल्याने ‘राजधानी’च्या भोजनयानातील सर्वच खानसामे त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी सज्ज झाले होते. त्याला आवडते म्हणून आलू-गोबी ही खास भाजी बनवण्यात आली होती. त्याशिवाय चिकन तंदुरी, चिकन मलाई, चिकन मसाला असा सरंजाम होता. तसेच गोड पदार्थामध्ये रसमलाईचा समावेश होता.