बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर हे त्यांच्या ट्विटसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे ‘खुल्लम खुल्ला’ हे आत्मचरित्र आता प्रकाशित करण्यात येत आहे. आपल्या या आत्मचरित्राची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. आपल्या आयुष्यातील काही मनोरंजक गोष्टी त्यांनी या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. यात त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यांची भेट, तसेच एकेकाळी त्यांच्या आयुष्यात आलेल्या नैराश्याबद्दलही भाष्य केले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांनी त्यांच्या आत्मकथेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबतच्या मुलाखतीबाबतही भाष्य केले आहे. या पुस्तकात दाऊदविषयी दोन गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्या अशा..

दाऊद म्हणालेला की, तुला कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर मला सांग
ही १९८८ सालातील गोष्ट आहे. माझा जवळचा मित्र बिट्टू आनंद याच्यासोबत मी आशा भोसले आणि आरडी बर्मन यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला आलो होतो. दाऊदचा एक माणूस नेहमीच विमानतळावर असायचा. मी तेथून जातो होते त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती माझ्याजवळ आली. त्याने मला फोन दिला आणि म्हटलं, दाऊद साहेब तुमच्याशी बोलतील. त्यानंतर माझी एका गो-या, जाडं असलेल्या व्यक्तिशी भेट करून देण्यात आली. तो ब्रिटीश वाटत होता. तो दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख असलेला बाबा होता. तो मला म्हणाला की, दाऊद साहेबांना तुमच्यासोबत चहा प्यायचा आहे. मला यात चुकीच वाटलं नाही. त्यामुळे मी ते आमंत्रण स्वीकारलं. त्या संध्याकाळी मला आणि बिट्टूला एका चमकत्या रोल्स रॉयस गाडीमधून हॉटेलवरून नेण्यात आले. आमची गाडी उलटसुलट जात असल्याचे मला जाताना लक्षात आले. त्यामुळे मी त्याच्या घराचं निश्चित स्थान सांगू शकत नाही.

दाऊद आणि ऋषी कपूर यांची भेट झाली तेव्हा..
दाऊद पांढ-या रंगाच्या इटालियन कपड्यांमध्ये माझ्यासमोर आला. त्याने आमचे स्वागत केले. आमची क्षमा मागण्याच्या अंदाजात तो म्हणाला, मी मद्यपान करत नसल्यामुळे तुम्हाला चहासाठी बोलावले. त्यानंतर आमचे चहापान जवळपास चार तास चालले. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर माझ्याशी चर्चा केली. तसेच, त्याने केलेल्या अपराधांविषयी त्याला पश्चाताप नसल्याचे म्हटले.  माझे स्वागत करत त्याने कोणत्याही गोष्टीची गरज असल्याचे मला सांगा असे म्हटले. त्याचसोबत मला त्याच्या घरी येण्याचे आमंत्रणही दिले, हे ऐकून मी चकीत झालो. पुढे तो म्हणाला की, मी छोट्या मोठ्या चो-या केल्या आहेत. पण कोणालाही जीवे मारले नाही. हा पण मी एकाला मारण्याचे आदेश दिले होते. एका व्यक्तिने त्याच्याशी खोटे बोलल्यामुळे त्याला गोळी मारण्याचे आदेश त्याने दिले होते. त्याने काय सांगितले ते मला नीट आठवत नाही. तो व्यक्ती कदाचित अल्लाहच्या आदेशाच्या विरोधात गेल्याने त्याने असे केले असावे. मी अल्लाहचा संदेशवाहक होतो. त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी त्या व्यक्तिच्या जीभेवर गोळी मारली आणि नंतर डोक्यात, असे दाऊद म्हणाला. दिग्दर्शक राहुल रवैलने त्याच्या अर्जुन (१९८५) चित्रपटातील कोर्टरूम खूनाचे दृश्य याच प्रकारे चित्रीत केले होते.

‘तवायफ’ चित्रपटातील ऋषीची भूमिका दाऊदला आवडली
मी ‘तवायफ’ चित्रपटात त्याला खूप आवडलो होतो. कारण, त्या चित्रपटात माझे नाव दाऊद असे होते. माझे वडिल आणि काका यांचेही काम त्याला आवडत असल्याचे तो म्हणाला. दाऊदच्या घरी जाताना मला भीती वाटत होती. पण, संध्याकाळ होईपर्यंत माझ्या मनातील भीती कमी झाली. या चार तासात आम्ही कितीतरी कप चहा घेतला. तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही ना, असे त्याने मला पुन्हा विचारले. तो म्हणालेला की, तुम्हाला कितीही पैशांची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची गरज असो तुम्ही मला सांगा. त्यावर मी त्याचे आभार मानत आमच्याकडे सर्वकाही आहे, असे म्हटले.