आपण एकाच पानावर फार काळ अडकून बसणे चुकीचे आहे. पुढची पाने उलटली पाहिजेत. त्यात फार वेगळ्या गोष्टी दडलेल्या असतात, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत बॉलिवूडच्या किंग खानने सलमानबरोबरचे शत्रुत्वाचे प्रकरण संपविले. मैत्रीचे नवे प्रकरण सुरू व्हावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
पडद्यावर आणि पडद्याबाहेरही सलमान आणि शाहरूख या दोन खानांची घट्ट मैत्री होती. ‘करण-अर्जुन’, ‘कुछ कुछ होता है’  या चित्रपटांत दोघांनी एकत्र काम केले होते. पण कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीत अशी काही घटना घडली की, या दोघांची पक्की दोस्ती शत्रुत्वात बदलली. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांबद्दल जाहीरपणे राग व्यक्त केला होता. त्यानंतर कुठल्याही कार्यक्रमात सलमान आला की शाहरूखने उशिरा यायचं किंवा शाहरूख असेल तर सलमानने जायचंच नाही, असे प्रकार सुरू झाले. दोघांच्याही कंपूतील कलाकारांनीही आपापसांत एकत्र चित्रपट करणे टाळले. या दोघांमध्ये दिलजमाई व्हावी यासाठी कित्येकांनी प्रयत्न केले. परंतु, यात आपल्याला काडीमात्र रस नसल्याचे सलमानने वारंवार स्पष्ट केले.
अगदी ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानलाही आपल्या या दोन जिवलग मित्रांना एकत्र आणणे शक्य झाले नाही. मात्र रविवारी एका इफ्तार पार्टीत आमदार बाबा सिद्दिकी यांनी सलमान आणि शाहरूख या दोघांनाही एकत्र आणण्याची किमया साधली. या पार्टीत सुरुवातीला एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सलमान-शाहरूखला बाबा सिद्दिकी यांनी समोरासमोर आणून गळाभेट घडवून आणली. त्यानंतर ट्विटरवर शाहरूखनेही ‘हे जे झाले ते योग्यच!’, असे म्हणत आपल्या भावना मनमोकळेपणे व्यक्त केल्या. सलमानने मात्र पार्टीतील दिलजमाईनंतर अजून काहीही मत व्यक्त केलेले नाही. परंतु, नजिकच्या काळात जाहीरपणे सलमान-शाहरूख खान रूपेरी पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र चित्रपटात पाहायला मिळतील आणि कार्यक्रमांमध्येही त्यांची मैत्री दिसेल अशी आशा करायला हरकत नाही.