सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात दर गुरुवारी ‘कर्मवीर स्पेशल एपिसोड’ होतो. ज्यामध्ये प्रेक्षकांची अशा व्यक्तीशी भेट होते ज्यांनी समाजाच्या हितासाठी नि:स्वार्थी मनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले असते. येत्या गुरुवारी कर्मवीर म्हणून अभिनेते सयाजी शिंदे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. ‘झाडे लावा झाडे जगवा’ या संदेशासोबत पर्यावरणाचे गांभीर्य आणि झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन सयाजी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वत: वृक्षारोपणाची जबाबदारी पेलली आहे.

या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या मनात झाडांविषयी पहिला विचार कधी आला हे सांगितले आणि ‘झाड’ या विषयावरील आणि झाडाचे महत्त्व पटवून देणारी कविता देखील सादर केली. या मंचावर कर्मवीर सयाजी शिंदे यांच्यासोबत नागराज यांनी केलेल्या खास बातचीतसोबत रंगलेला खेळ २७ जून रोजी रात्री ८:३० वाजता प्रसारित होईल.

आपल्या बुद्धीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, असं सांगणारा कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सोनी टीव्हीवर ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येऊन महिना झाला आहे. मराठीच्या या पर्वाचं सूत्रसंचालन ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे करत आहेत. आतापर्यंत या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.