Bigg Boss 17 update : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’चं दुसरं पर्व संपल्यानंतर प्रेक्षकांचं ‘बिग बॉस १७’ कडे लक्ष लागून राहीलं होतं.
अशातच ‘बिग बॉस’ सुरू होण्याच्या १० दिवसाआधी स्पर्धकांची नावं समोर आली. अंकिता लोखंडे, विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्टसारखे कलाकार या नव्या पर्वात दिसणार आहेत. आता यांच्याबरोबरीनेच ९० च्या दशकातील एका लोकप्रिय आणि वादग्रस्त अभिनेत्रीचीही चर्चा समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी ही ‘बिग बॉस १७’मध्ये स्पर्धक म्हणून दिसू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यानिमित्ताने ममता पुन्हा चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार अशी चर्चा आहे.
आणखी वाचा : “शाहरुखने जे केलंय ते आम्ही दिग्दर्शक…” ‘जवान’बद्दल भरभरून बोलले विशाल भारद्वाज
आजवर बिग बॉसमध्ये पूजा भट्ट, तनिशा मुखर्जी, रिमि सेन, मिनिषा लांबासारख्या कित्येक अभिनेत्रींनी सहभाग घेतला आहे. आता ममता कुलकर्णीचं नाव समोर आल्याने या शोची आणखी चर्चा होऊ लागली आहे. ९० च्या दशकात मॅगजीनसाठी केलेलं टॉपलेस फोटोशूट, ड्रग्स केस अन् एकंदरच वादग्रस्त खासगी आयुष्य यामुळे ममता कायम चर्चेत राहिली होती.
२००३ मध्ये ममताने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला अन् विकी गोस्वामीशी तिने लग्नगाठ बांधली. ममतावर अजूनही काही कोर्ट केसेस सुरू आहेत. अद्याप ममता बिग बॉस १७ मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे की नाही किंवा तिची वाइल्ड कार्ड एंट्री होणार याबद्दल अजूनही अधिकृत वक्तव्य कुणीच केलेलं नाही. ममताने सलमानबरोबर ‘करण-अर्जुन’मध्ये काम केलं आहे, आता ‘बिग बॉस १७’च्या निमित्ताने या दोघांचं रीयुनियन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.