‘मेंदीच्या पानावर’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘लव्ह लग्न लोचा’ अशा मालिकांमधून अभिनेत्री अक्षया गुरवने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. तिच्या सहज व सुंदर अभिनयाचे हजारो चाहते आहेत. मालिकांशिवाय अक्षयाने बऱ्याच मराठी चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. याशिवाय तिने काही दिवसांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतली होती. यानंतर नुकतीच तिने ‘हंच मीडिया’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी इंडस्ट्रीत आलेल्या बऱ्याच अनुभवांबाबत अभिनेत्रीने भाष्य केलं.

“मध्यंतरीच्या काळात इंडस्ट्रीपासून तू दूर होतीस का?” या प्रश्नावर अक्षया म्हणाली, “हो…मी सलग चित्रपट केले नाहीत. पण, आजवर जी कामं केली आहेत ती सगळी उत्तमप्रकारे करून काहीशा वेगळ्या धाटणीच्या भूमिका मी निवडल्या होत्या. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक संघर्षाचा किंवा वाईट काळ येतो. तसाच माझ्याही आयुष्यात आला होता, तेव्हाच माणूस स्वत:च्या पायावर उभा राहायला शिकतो. गेल्यावर्षी माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि आम्ही दोघंही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. ऑपरेशन झाल्याने तो जवळपास ५ ते ६ महिने घरी होता आणि त्या काळात माझ्याकडे काही कामच नव्हतं.”

हेही वाचा : Video : स्पृहा जोशीचं छोट्या पडद्यावर कमबॅक! ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार नवी मालिका, सेटवरून शेअर केला खास व्हिडीओ

अक्षया पुढे म्हणाली, “तो काळ माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट काळ होता. मी काही लोकांना सांगितलं होतं की, ‘प्लीज काम द्या’ त्या दिवसांमध्ये मी कोणतीही भूमिका करण्यासाठी तयार होते. कारण, प्रत्येक कलाकारासाठी काम खूप महत्त्वाचं असतं. त्या मधल्या काळात मला एका शोसाठी ऑफर आली होती. मोठं चॅनेल आहे त्यामुळे मी नाव घेणार नाही. त्यांनी मला फायनल केलं, लूक टेस्ट, मॉक शो झाले, संपूर्ण प्रक्रिया पार पडली आणि अचानक आदल्या रात्री मला फोन करून सांगितलं तुझ्याबरोबर आम्ही काम करणार नाही. आम्ही त्या पात्रासाठी दुसरी अभिनेत्री कास्ट केली आहे.”

हेही वाचा : आलियाच्या बहिणींनी लग्नात पळवले होते रणबीर कपूरचे शूज; शेवटी मेहुणीबरोबर ‘अशी’ केली मांडवली

“मला त्या प्रसंगानंतर खरंच खूप जास्त वाईट वाटलं होतं. कारण, कमिटमेंट केली जाते, अग्रीमेंट साइन केलं, त्या मालिकेसाठी मी एक हिंदी वेबसीरिज सोडली होती. त्यात माझ्या घरी कठीण काळ सुरू होता. मी खरंच तेव्हा खूप जास्त खचले. मी रडले नाही…पण, माझ्या मनाला ती गोष्ट प्रचंड लागली. कदाचित ते पात्र माझ्यासाठी नव्हतं आणि तो शो आता बंद होतोय. ज्या शोसाठी मला विचारलं, पुढे जाऊन काढलं, दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केलं त्याबद्दल यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाहीये. आज पहिल्यांदाच मी याबद्दल एवढं सगळं बोलले आहे.” असं अक्षया गुरवने स्पष्ट केलं आहे.