अभिनेत्री ते निर्माती असा प्रवास करत श्वेता शिंदेने मराठी कलाविश्वात आपली ओळख निर्माण केली. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये तिने स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. गेल्या काही वर्षात ‘लागिर झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’, ‘देवमाणूस’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांची निर्मिती तिने केली. नुकत्याच महाएमटीबीला दिलेल्या मुलाखतीत श्वेताने तिच्या महाविद्यालयीन दिवसांतील आठवणी सांगितल्या.

बालपणाबद्दल सांगताना श्वेता शिंदे म्हणाली, “माझा जन्म साताऱ्याचा आहे आणि पुढे पहिली ते दहावी माझं शिक्षण सुद्धा साताऱ्यात झालं. माझे आई-वडील सुद्धा तिकडेच असतात. आमचं तिथे कल्पतरू नावाचं छान असं टुमदार घर आहे आणि अर्थात त्या घराशी माझं खूप जवळचं नातं आहे.”

हेही वाचा : “…अन् ते माणूसपण उद्धवजींमध्ये पाहिलं”, आदेश बांदेकरांनी सांगितला ठाकरे कुटुंबीयांचा अनुभव; बाळासाहेबांबद्दल म्हणाले…

श्वेता पुढे म्हणाली, “कॉलेजमध्ये जायची वेळ आली तेव्हा असं वाटलं, आता आपण कुठेतरी साताऱ्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणून, मी मुंबई किंवा पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला माझ्या वडिलांचा बाहेर शिक्षण घ्यायला विरोध होता. ते नाही म्हणत होते पण, बाहेर जायचं यावर मी ठाम होते. माझ्या आईची सुद्धा अशीच इच्छा होती. त्यामुळे पुढे मी मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयात प्रवेश घेतला. साताऱ्यातून बाहेर पडून थेट मिठीबाई कॉलेज हा माझ्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या खूप मोठा शॉक होता.”

हेही वाचा : Video : रोमँटिक डेट, गेटवे ऑफ इंडियाला सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरची पती हिमांशूसाठी खास पोस्ट

“मिठीबाईमध्ये येऊन मला एक वेगळं विश्व, एक वेगळी दुनिया या सगळ्या गोष्टी जाणवल्या. त्यामुळे सुरुवातीला सगळ्या गोष्टी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागला. पण, माझं शिक्षण कॉन्व्हेंट शाळेतून झाल्यामुळे मला एवढाही त्रास झाला नाही. माझं कॉलेज खूप जास्त ग्लॅमरस असल्याने मला शिक्षणानंतर हळुहळू एक-एक ऑफर्स येऊ लागल्या.” असं श्वेताने सांगितलं.

बॉलीवूड कलाकारांबरोबर असलेल्या खास कनेक्शनबद्दल श्वेता सांगते, “कॉलेजमध्ये करीना कपूर, शाहिद कपूर, इशिता भट या सगळ्यांना मी पाहिलंय. हे लोक सुद्धा मिठीबाईला होते. अजय देवगण, करिश्मा कपूर मला एक बॅच सिनिअर होते. त्यामुळे त्यांना मी कॉलेजमध्ये कधी पाहिलं नव्हतं. विवेक ओबेरॉय माझ्यापेक्षा दोन बॅच सिनिअर होता. त्यामुळे तेव्हा या सगळ्यांशी माझं बोलणं सुद्धा झालेलं आहे.”

हेही वाचा : ना गुलाबी रंगाचा ड्रेस, ना साडी; बायको मंजिरीचा डान्स पाहून प्रसाद ओक म्हणतो…; मजेशीर व्हिडीओ व्हायरल

“आताचे हे आघाडीचे कलाकार तेव्हा कॉलेजमध्ये खूप सक्रिय होते. नाटक असो किंवा फॅशन शो सगळ्यात त्यांचा सहभाग असायचा. मी सुद्धा फॅशन शोमध्ये काम केलं पण, या गोष्टी माझ्या घरी माहिती नव्हत्या. असाच एक फॅशन शो करताना मला टेलिव्हिजनची ऑफर आली.” अशाप्रकारे कलाविश्वातील प्रवास सुरू झाल्याचं श्वेता शिंदेने सांगितलं.