गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झाला. ‘बाळकडू’, ‘संजू’, ‘विकी वेलिंगकर’, ‘बॉईज ४’ अशा चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत गौरवने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे.

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरव मोरेनं प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आता त्याच्या याच कामाची आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची त्याला पोचपावती मिळाली आहे, याबद्दल त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

गौरव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही अनेकदा तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२४’चा सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात गौरवला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याबद्दल गौरवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केलीय.

हेही वाचा… तब्बल २७ वर्षानंतर काजोल करणार ‘या’ सुपरस्टारबरोबर काम; चित्रपटाच्या शूटिंगला झाली सुरूवात

पुरस्कार सोहळ्यासाठी गौरवने खास हिरव्या रंगाच्या ब्लेझरची आणि सफेद शर्टाची निवड केलेली दिसतेय. या फोटोमध्ये गौरवच्या हातात सांस्कृतिक कलादर्पण २०२४ ची ट्रॉफी आहे. या फोटोला गौरवने कॅप्शन देत लिहिलं, “सांस्कृतिक कलादर्पण २०२४ मध्ये ‘बॉईज ४’ या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल विशाल देवरुखकर आणि माझ्या ‘बॉईज ४’ टीमचे मी आभार मानतो.”

गौरवला मिळालेल्या पुरस्कारासाठी अनेक कलाकारांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. ऋतुजा बागवे, रितिका श्रोतीने या फोटोंवर कमेंट करत गौरवचं खास अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा… ब्रेकअपनंतर श्रुती हासनने पहिल्यांदाच सोडलं मौन; अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्याचा…”

‘बॉईज ४’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट २० ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटात गौरव मोरेसह पार्थ भालेराव, प्रतीक लाड, रितिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, सुमंत शिंदे यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

हेही वाचा… RCBच्या सामन्यादरम्यान अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावरचे बदलले हावभाव; व्हिडीओ व्हायरल होताच चाहते म्हणाले…

दरम्यान, गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या गौरव हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये काम करत आहे. या शोमध्ये त्याच्यासह कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. गौरवचा आगामी चित्रपट ‘महापरिनिर्वाण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात गौरव महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.