‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. अभिनय व विनोदाची उत्तम सांगड घालत पृथ्वीक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. पृथ्वीकने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने करिअर व वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. यावेळी पृथ्वीकने ब्रेकअपचा अनुभवही सांगितला.
पृथ्वीकने ‘संपूर्ण स्वराज’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आडनाव, जात, करिअर अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पृथ्वीकने या मुलाखतीत कांबळे आडनाव का लावत नाही, याबाबत खुलासा केला. दलित असल्यामुळे ब्रेकअप झाल्याचंही त्याने सांगितलं. तो म्हणाला, “माझ्या गर्लफ्रेंडने मी दलित आहे, म्हणून माझ्याबरोबर ब्रेकअप केले. माझे पाचपैकी चार रिलेशनशिप ‘अब्बा नही मानेंगे’ यामुळे तुटले आहेत.”




“कॉलेजमध्ये माझी एक गर्लफ्रेंड होती. तिचे आईबाबा अजूनही माझ्याशी चांगले वागतात. तिची आणि माझी जात वेगळी होती. तिचे आईबाबा अजूनही माझ्याशी फोनवर बोलतात. त्यांच्या घरच्या कार्यक्रमांना बोलवतात. घरी जेवायलाही बोलवतात. माझा एखादा एपिसोड आवडला तर अजूनही ते मला फोन करुन सांगतात,” असं पृथ्वीकने सांगितलं.
गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअपचा किस्सा शेअर करत पृथ्वीक म्हणाला, “एके दिवशी गर्लफ्रेंड येऊन मला आपलं रिलेशनशिप वर्कआऊट होत नाहीये, असं म्हणाली. त्यावर मी तिला आपलं काय वर्कआऊट होत नाहीये, असं विचारलं. आपण रोज भेटतो, काही खावसं वाटलं तर खातो. आपण फिरायला जातो, समुद्रावर बसतो. छान मज्जा करतो. आपण रात्री एकाच ट्रेनने घरी जातो. मग प्रॉब्लेम काय आहे, असं मी तिला विचारलं. यावर तिने आईवडिलांना आवडणार नाही, असं उत्तर दिलं. आपलं कॉलेज संपलंय, तुझ्याकडे जॉब नाहीये असंही ती म्हणाली.”
“तेव्हा मी आंबट गोड नावाची मालिका करत होतो. मी तिला म्हटलं, तुझ्या आईवडिलांना पण आवडलं. त्यावर ती मला, तू शाहरुख खान नाहीस. दोन एपिसोडनंतर पुढे काय? असं म्हणाली. मला दोन वर्ष दे मी मालिकेत काम करून पैसे कमवेन, स्वत:चं घर घेईन असं तिला सांगितलं. मी तिचे सगळे मुद्दे खोडून टाकलेत हे तिच्या लक्षात आलं. मग ती आपली जात वेगळी आहे, असं मला म्हणाली. याआधी पण माझे तीन ब्रेकअप जातीमुळे झाले होते,” असंही पुढे पृथ्वीकने सांगितलं.