बहुआयामी, हरहुन्नरी, आपल्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशीची नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘सुख कळले’ या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत स्पृहासह अभिनेता सागर देशमुख, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, बालकलाकार मिमी खडसे पाहायला मिळणार आहेत. शिवाय या मालिकेत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत, केदार शिंदे यांच्याबरोबर काम करणारा अभिनेता देखील झळकणार आहे. हा अभिनेता कोण आहे? हे जाणून घेऊयात.

हेही वाचा – ‘पारु’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट, पोस्ट करत म्हणाला, “काम फार…”

स्पृहा जोशी व सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली ‘सुख कळले’ ही मालिका २२ एप्रिलपासून रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे. या मालिकेत माधव म्हणजे सागर देशमुखच्या मेव्हण्याचा भूमिकेत अभिनेता स्वप्नील परजणे झळकणार आहे. याच स्वप्नीलने कंगना रणौत, केदार शिंदेसह काम केलं होतं.

‘सुख कळले’ या मालिकेपूर्वी स्वप्नील ‘तू चाल पुढं’, ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकांमध्ये दिसला होता. त्याने केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात काम केलं होतं. २०२३मध्ये स्वप्नील कंगना रणौतबरोबर अ‍ॅमेझोन प्राइमच्या जाहिरातीत दिसला होता. याच अर्थ स्वप्नीलने आपल्या अभिनयाचा ठसा मराठीसह हिंदीतही उमटवला आहे. त्याने काही हिंदी शो, जाहिरातीमध्ये काम केलं आहे. आता स्वप्नील ‘सुख कळले’ या मालिकेत दिसणार आहे.

हेही वाचा – IPL 2024: “अजून पण सांगतो नारळ द्या…”, मुंबई इंडियन्सच्या चौथ्या पराभवानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

दरम्यान, ‘सुख कळले’ या मालिकेव्यतिरिक्त ‘कलर्स मराठी’वर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा नवा विनोदी कार्यक्रम देखील खळखळून हसवण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २७ एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता हा नवा विनोदी कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.