अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. क्रांती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. शिवाय आपलं परखड मत देखील व्यक्त करत असते. तिच्या दोन जुळ्या गोंडस मुलींचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. नुकताच क्रांतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लेकीबरोबर घडलेला किस्सा सांगितला आहे.

क्रांती रेडकरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये छबीलचा किस्सा सांगितला आहे. व्हिडीओत क्रांती म्हणते, “ऐरवी छबील, गोदोचा स्क्रीन टाइम ठरलेला असतो की इतके तास तुम्ही बघू शकता. किंवा हेच कार्यक्रम बघायचे, हे सगळं ठरलेलं असतं. पण आता सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे आपोआप स्क्रीन टाइम वाढलेला आहे. छबलीचं जरा जास्त झालंय, नुसतं आयपॅड आयपॅड करते. त्यामुळे माझी सटकली. म्हटलं, छबील बसं कर आता, इतका वेळ आयपॅड बघितलास, तुझे डोळे खराब होतील. ती मला म्हणाली, पण मम्मी जर मी आयपॅड नाही बघितला तर आयपॅड खराब होईल. याच्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी म्हटलं, मस्त.” क्रांतीच्या या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. “कडक उत्तर”, “मुली तुमच्यापेक्षा हुशार आहेत”, “जबरदस्त डायलॉग, मी आयपॅड नाही पाहिला तर आयपॅड खराब होईल”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितेश चव्हाणच्या बहिणी म्हणून झळकणार ‘या’ चार अभिनेत्री, नवा दमदार प्रोमो पाहा

क्रांतीचा हा मजेशीर व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर एक चाहता म्हणाला, “तिला सांगायचं ना आयपॅड दुसरा मिळतो. डोळे दुसरे बसवायचे का?” दुसरी चाहती म्हणाली, “लेकरं लय अवघड आहेत. माझ्या मुलीला म्हणलं फोन बघू नको. ती म्हणते, कदाचित हा सिल्याबस आला तर…” तिसरी चाहती म्हणाली, “अरे आमच्याकडे पण असंच चालू आहे.”

हेही वाचा – ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनच्या साधेपणाने वेधलं लक्ष, पत्नीसह ५ स्टार हॉटेलमध्ये नाही तर जेवला ढाब्यावर, फोटो व्हायरल

दरम्यान, क्रांतीच्या रेडकरच्या कामाबद्दल बोलायचं झाला तर, तिने आपल्या अभिनय व नृत्य कौशल्याने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. एवढंच नव्हे तर तिने दिग्दर्शन क्षेत्रातही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रांती शेवटची ‘कलर्स मराठी’च्या ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात झळकली होती. तिने या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती. याशिवाय क्रांतीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला दुसरा ‘रेनबो’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यापूर्वी तिने जितेंद्र जोशी आणि ऊर्मिला कोठारे अभिनीत ‘काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.