बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला आयुष्यात एकदा तरी भेटता यावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. विशेषत: बॉलीवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार किंग खानला आयडॉल मानतात. काही वर्षांपूर्वी शाहरुखने ‘झी मराठी’च्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी निलेश साबळे आणि शाहरुख खानची भेट झाली होती. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने शाहरुखकडून काय प्रेरणा घेतली याबद्दल सांगितलं आहे.

निलेश साबळे सांगतो, “शाहरुख खानचं एक खूप चांगलं वाक्य आहे. मी त्याच्याच एका मुलाखतीत ऐकलं होतं. तो म्हणाला होता की, मी एखाद्या सेटवर जातो तेव्हा मी स्वत:ला भाड्याने देतो. मी फराह खानच्या सेटवर जातो तेव्हा ती माझी मैत्रीण आहे या सगळ्या गोष्टी ठिक आहेत. पण, माझा ९ चा कॉल टाइम असेल, तर तिथून पुढे मी स्वत:ला भाड्याने दिलंय. माझ्या कामाच्या वेळेत तिने मला शंभर वेळा नाचवावं, दोनशे वेळा उड्या मारून घ्याव्यात मी एकही प्रश्न विचारणार नाही.”

हेही वाचा : “मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”

शाहरुखबद्दल सांगताना निलेश पुढे म्हणतो, “माझं काम झालं…पॅकअपनंतर तिने मला सोडावं. मग, त्या क्षणापासून ती पुन्हा माझी मैत्रीण असेल. त्याआधी सेटवर मी फक्त तिचं ऐकणार. असं शाहरुखने सांगितलं होतं. एवढा मोठा माणूस जेव्हा अशी भूमिका घेतो तेव्हा खरंच ही मोठी गोष्ट असते. हाच स्वभाव भाऊ कदमचा आहे आणि आता ओंकार भोजनेच्या बाबतीत सुद्धा मला असंच जाणवतंय.”

हेही वाचा : निलेश साबळेने सांगितला राज ठाकरेंच्या घरी घडलेला ‘तो’ किस्सा; म्हणाला, “माझ्या कोणत्याही मिमिक्रीवर…”

“ओंकार भोजनेबरोबर मी याआधी काम केलेलं नाहीये. पण, मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की, जे तुम्ही आजवर भाऊकडून अनुभवलंय अगदी तसंच काम ओंकार भोजने सुद्धा करतो. त्याचा चाहतावर्ग आधीच खूप मोठा आहे पण, त्यात निश्चित अजून वाढ होणार कारण, ओंकारचं एक वेगळंच रुप तुम्हाला या ( हसताय ना? हसायलाच पाहिजे) कार्यक्रमात बघायला मिळणार आहे.” असं निलेश साबळेने सांगितलं.