‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्नसोहळा २६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला होता. दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. लग्नानंतर काही दिवसांतच अभिनेत्रीने पुन्हा एकदा मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली होती. यानंतर तितीक्षा गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिकला तिच्या सासरी गेली होती. लग्नानंतर व्यग्र वेळापत्रकामुळे अभिनेत्रीला तिच्या माहेरी जाता आलं नव्हतं. आता तितीक्षा वेळात वेळ काढून आपल्या नवऱ्यासह माहेरी आली होती.

लग्नाला ३ महिने पूर्ण झाल्याचं औचित्य साधत तितीक्षा माहेरी आली होती. यावेळी तिच्याबरोबर नवरा देखील उपस्थित होता. या दोघांचं तावडेंच्या घरी अर्थातच तितीक्षाच्या माहेरी तिच्या आई-बाबांनी जंगी स्वागत केलं. दारातच अभिनेत्रीच्या आईने दोघांना ओवाळलं, गोडाचं भरवून मग या जोडप्याने घरात प्रवेश केला. कुटुंबीयांबरोबर एकत्र वेळ घालवून घरच्या देव-देवतांचं दर्शन घेतलं. संकष्टीच्या दिवशी घरी गेल्याने तितीक्षाच्या घरी खास मोदकांचा बेत केला होता. यानंतर या कुटुंबीयांनी एकत्र मिळून देवाची आरती केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

हेही वाचा : विक्रांत मेस्सीसह एकाच बॉलीवूड चित्रपटात झळकणार प्रसाद ओक अन् छाया कदम! सिनेमा कधी व कुठे पाहता येणार?

एकत्र वेळ घालवल्यानंतर तितीक्षाच्या आईने लेकीची ओटी भरून लाडक्या जावयाचं मानपान केलं. यानंतर सगळ्यांनी मिळून तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला तीन महिने झाल्याचा केक कापला. एकंदर लेकीच्या घरी येण्याने आई-बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. यावेळी तितीक्षाने तिच्या माहेरच्या घराची संपूर्ण झलक दाखवली. घरात एका बाजूला त्यांचे लहानपणीचे फोटो, आई-बाबांचे फोटो, मोठी बहीण व अभिनेत्री खुशबूच्या पहिल्या फोटोशूटचे फोटो, खुशबू आणि संग्रामच्या लग्नातील फोटो या गोष्टी तितीक्षाच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाल्या.

हेही वाचा : शाहरुख खान ते ऐश्वर्या राय; सगळ्या बॉलीवूड कलाकारांना मागे टाकत दीपिका पदुकोण ठरली अव्वल! काय आहे कारण?

दरम्यान, तितीक्षाने या गोड आठवणी युट्यूबवर व्हिडीओच्या रुपात शेअर केल्या आहेत. सध्या तिचे चाहते कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्रीच्या घरातील साधेपणाचं कौतुक करत आहेत. तसेच “हा स्वभाव कायम जप” असा सल्ला अनेकांनी तितीक्षाला कमेंट्समध्ये दिला आहे. यावर अभिनेत्रीने देखील तिच्या सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : “थोडं शेण लावा…”, नेटकऱ्याच्या खोचक कमेंटवर ऐश्वर्या नारकरांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाल्या…

दरम्यान, सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याचवेळी दोघांमध्ये मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अभिनेत्रीने आतापर्यंत ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.